पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/330

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३१८ ] हा होय. व यापासूनच आणखी दोन कार्यभाग उद्भवतात. म्हणजे एकंदरींत समाजांत पैसा चार् कार्यभाग उरकतो. विनिमयसामान्य-पैशाचें हें कार्य फार महत्वाचें आहे. ऐनजिनसी व्यवहारामध्यें सवदा ठरण्यास फार अडचण पडते असें सांगितलें आहे; परंतु पैशासारखा सर्वांनीं कबूल केलेला असा पदार्थ आस्तित्वांत आला ह्मणजे या पैशाच्या द्वारें अदलाबदल होणें फारच सुलभ होतें. कारण ज्याच्याजवळ धान्य आहे तेी बाजारांत जाऊन आपलें धान्य हा सर्वमान्य पैसा घेऊन ज्याला धान्याची गरज आहे त्याला विकतो व मग आपल्याला हवी असणारी वस्तु या पैशानें पुन्हां विकत घेतो. वर वर पाहतां ऐनजिनसी व्यवहारापेक्षां निष्कव्यवहार भानगडीचा दिसतो खरा; तरी पण ते फार सोईचा होतो. कारण एखादा पदार्थ एकदां पैसा या दृष्टीनें सर्वमान्य झाला ह्मणजे त्याची सर्वांना नेहमीं गरजच असते. कारण हा पैसा आपल्याजवळ असला ह्मणजे पाहिजे ती वस्तू आपल्याला त्याच्या बदली मिळवितां येईल अशी खात्री असते; यामुळें ज्याला जी वस्तु पाहिजे असेल ती पैशानें मिळण्यास अडचण पडत नाहीं. तसेंच ज्याला आपल्या वस्तू दुस-यास द्यावयाच्या आहेत त्याला त्या पैसा घेऊन विकतां येतात. मोलाचे सर्वसाधारण परिमाण-पैशाचें हें कार्यही पहिल्याइतकेंच महत्वाचें आहे. ऐनजिनसी व्यवहारांत वस्तूचें मोल ठरविणें कठीण असतें असें मागें सांगितलेंच आहे. मोल ही कल्पनाच मुळीं सापेक्ष आहे ह्मणजे एका वस्तूचें मोल तिच्याशीं तुलना करावयाच्या इतक्या निरनिराळ्या वस्तूंच्या रुपांत सांगतां येईल. परंतु मोलाची तुलना करण्याकरितां एका पदार्थाचा संकेत एकदां केला ह्मणजे वस्तूचें मोल सांगणे फार सोपें होतें व असा संकेतित पदार्थ ह्मणजेच पैसा होय व या संकेतित पदार्थामधलें मोल म्हणजे पदार्थाची किंमत असें आपण सामान्य व्यवहारांत म्हणतों. व एकदां निरनिराळ्या पदार्थांच्या किंमती ठरल्या ह्मणजे पदार्थांची अदलाबदल करणें अत्यंत सोपें जातें. एका कोटाबद्दल किती जोडे दिले पाहिजेत हें काढणें पैशाच्या किंमतीच्या साहाय्याने फारच सुलभ होतें. समजा, कोटाची किंमत १० रुपये आहे व जोड्याची किंमत २|| रुपये आहे, ह्मणजे एका कोटाबरोबर ४ जोड्यांचे जोड आहेत हें उघड झालें.