पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/325

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



[३१३]

परंतु ही मूळकिंमत वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढू नये याला दोन उपाय आहेत. एक शेतकीच्या पद्धतींतील सुधारणा व दुसरा परदेशांहून धान्याची आयात होणें. या कारणांनीं मूळ-किंमत वाढण्याच्या कलाला थोडासा प्रतिरोध होतो. परंतु कृषिज व खनिज संपत्तीचा विशेष हा कीं, त्याच्या उत्पत्तीचा खर्च कायमचाच निरनिराळ्या पाय-यांवर राहतो. अर्थात् सर्वांत उंची जमिनीवरील उत्पन्नाचा खर्च सर्वांत कमी असतो. मध्यम जमिनीवरील उत्पन्नाचा खर्च पाहिल्यापेक्षां पुष्कळ जास्त असतो; व कनिष्ठ जमिनीवरील उत्पन्नाचा तर सर्वांत जास्त असतो. याला अर्थशास्त्राच्या भाषेंत लागवडीच्या धारेवरील जमीन ह्मणतात व या लागवडीच्या खर्चावर देशांतील एकंदर धान्याची किंमत अवलंबून असते. या कनिष्ठ जमिनीला ह्मणण्यासारखें भाडें मिळत नाही. वरील विवेचनावरून संपत्तीच्या दुस-या वर्गांतील वस्तूंच्या मूळ-किंमतीची मीमांसा सहज ध्यानांत येईल. ही मूळकिंमत सर्वांत जास्त खर्चाच्या जमिनीवरील लागवडीच्या खर्चावरून ठरते व खर्चाच्या पाय-या निरनिराळ्या राहतात व प्रतिरोधक कारणें अस्तित्वांत नसलीं ह्मणजे ही मूळ-किंमत वाढत जाण्याचा कल असतो.

संपत्तीच्या तिस-या वर्गाची स्थिति यापेक्षां अगदीं भिन्न असते. या वर्गासंबंधानें चढ़त्या पैदाशीचा नियम लागू असतो; निदान अधिक पुरवठा पूर्वींच्याच खर्चाच्या मानाच्या प्रमाणानें करतां येतो. या वर्गामध्यें बहुतेक सर्व कारखान्यांतल्या मालाचा समावेश होतो असें वर सांगितलेंच आहे. या कारखान्यांत अर्वाचीन काळीं मोठी क्रांति घडून आली आहे. पूर्वींचे घरगुती कारखाने जाऊन तेथें विराट-स्वरूपी कारखाने होऊं लागले आहेत. ही स्थिति शास्त्रीय शोधांनीं व यंत्रसामग्रीच्या वाढीनें घडून आली आहे, हें नव्यानें सांगण्याची जरूरी नाहीं; व या क्रांतीचा परिणाम श्रमविभागास जास्त अवसर देण्यांत होतो व त्यामुळे संपत्तीची विलक्षण वाढ होते, हेंही मागें दाखविलें आहे. या सर्वांचा परिणाम या वर्गांतील संपत्तीच्या उत्पत्तीचा खर्च कमी कमी होण्यांत होतो; व मूळ-किंमत या खर्चावर अवलंबून असते. तेव्हां ही मूळ-किंमतही कमी कमी होण्याचा कल उद्भूत होतो. ह्मणजे या वर्गांतील संपत्तीची मूळ-किंमत सर्वांत स्वस्त त-हेनें उत्पन्न करण्याचा जो खर्च त्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, हातमागाचें कापड व गिरणीचें कापड घ्या. गिरणींतल्या कापडाच्या उत्पत्ती-