पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/321

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


         [३०९]
 ३ ज्याचा पुरवठा तितक्याच खर्चानें किंवा कमी खर्चानें हवा तितका वाढवितां येतो अशा वस्तु. यांना सुवर्धनीय म्हणतां येईल.
 हे तीन वर्ग करण्याचें कारण या तीन वर्गांमधल्या वस्तूंच्या मूळ किंमतीची मीमांसा भिन्नभिन्न आहे हें होय.
 वस्तूची मूळकिंमत ही वस्तु उत्पन्न करावयास लागलेल्या खर्चावर अवलंबून आहे हें उघड आहे. परंतु पहिल्या वर्गांतील वस्तूंमध्यें हा प्रश्न उद्भवत नाहीं. कारण या वर्गांतील वस्तु उत्पन्न झाल्या त्यावेळीं त्या संपत्नीच्या बुद्धीनें उत्पन्न झालेल्याच नाहींत. कांहीं ठिकाणीं असा उद्देश असेल; परंतु ही गोष्ट अपवादादाखलच आहे. प्रसिद्ध ग्रंथकाराच्या हातचे लेख किंवा पत्रें यांची मूळ किंमत काय आहे ? ज्या काळीं तीं पत्रें लिहिलीं गेलीं त्या काळीं तो अजून ग्रंथकारही झाला नसेल. परंतु त्यानें नांव मिळविल्यावर त्याच्या स्मारक गेोष्टीला किंवा वस्तूला पुढें किंमत आली. नेपोलियन किंवा शेकस्पिअर यांच्यासंबंधाच्या एखाद्या क्षुल्लक वस्तुला किंवा स्मारकाला युरोपमध्यें हल्लीं विलक्षण किंमत येते; याचें कारण या दोन पुरुषांची निरनिराळ्या बाबतींतील विलक्षण कीर्ति होय. तेव्हां या वर्गांतील वस्तूंसंबंधानें मूळकिंमत व बाजारकिंमत हा फारसा भेद राहत नाहीं. कारण या पदार्थीची मूळकिंमत कांहींच नसते. त्याला आगंतुक कारणांनीं किंमत येते; व तें कारण ह्मणजे लोकांची अभिरुचि व वासना. समाजाच्या रानटी स्थितींत अशा वस्तु बिनमोल असतील तर आभिरुचि उत्पन्न झालेल्या व संपन्न समाजांत या वस्तूंना हजारों रुपयांची किंमत पडत असल. या वस्तु कोठें केराकोपऱ्याच्या ठिकाणीं निरुपयोगी वस्तू ह्मणून पडल्या असतील तर कोठं या वस्तूंच्या शोधार्थ एजंट फिरत असतील. तेव्हां या वस्तूंच्या किंमती बाजारभावाप्रमाणें मागणी व पुरवठा यांवरच सर्वस्वी अवलंबून असतात. मात्र येथें पुरवठा कोणत्याही कारणांनीं वाढविणें शक्य नसतें. तेव्हां पुरवठ्याची संख्या येथें ठराविक असते व येथें किंमत मागणी करणारांच्या संख्येवर असते. ज्याप्रमाणें लिलांवांतील मालाच्या किंमती मागणारांच्या चढाओढीनें ठरतात त्याप्रमाणेंच या मर्यादित वस्तूंच्या किंमती ठरतात. अर्थात् मागणारे वस्तूच्या संख्येइतके होईपर्यंत त्यांच्यामध्यें चढाओढ चालते व ही बरोबरी ज्या किंमतीनें होईल ती किंमत