पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/320

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३०८] नाहीं; तोच प्रकार प्रसिद्ध पुरुषांच्या स्मारक वस्तूंचाही आहे .त्यासुद्धा मर्यादित असणार. ज्या देशांत या वस्तूंना मागणी आहे, जेथें पुराणाभिमान असून लोकांमध्यें अभिरुचि उत्पन्न झाली आहे, जेथें पुराणसंग्रह करण्याची प्रवृत्ति उत्पन्न झालेली आहे व जेथें लोकांची सांपत्तिक स्थिति सुधारत आहे, अशा देशांत अशा पुराणवस्तूंना मागणी पुष्कळ असते व या वस्तूंकरितां लोक पुष्कळ पैसे खर्च करण्यास तयार असतात. तेथें या वस्तू संपत्ति पदाप्रत पावतात व त्यांची बाजारांत देवघेव होते. तेव्हां अशा प्रकारचा मर्यादित पदार्थाचा एक स्वतंत्र वर्ग बनतो. एकंदर संपत्तीच्या मानानें हा वर्ग अगदीं लहान आहे हें उघड आहे.

संपत्तिरूप वस्तूंचा दुसरा वर्ग म्हणजे कृषिज व खनिज पदार्थ होत. फार वर्षे वसाहत होऊन ज्या देशांमध्यें औद्योगिक प्रगति झालेली आहे अशा देशांतील कृषिज व खनिज पदार्थ म्हणजे धान्यादि पदार्थ व धातु, कोळसा, मीठ वगैरे खनिज पदार्थ यांचा पुरवठा वाढवितां आला तरी या ठिकाणीं उतरत्या पैदाशीचा नियम लागू झालेला असतो. अर्थात या पदार्थाचा अधिक पुरवठा करण्यास पूर्वीच्या प्रमाणापेक्षां जास्त जास्त खर्च येत असते. म्हणजे पदार्थाच्या पहिल्या एका १०० च्या संख्येला जितका खर्च लागला त्यापेक्षां जास्त खर्च तितकें आणखी उत्पन्न काढण्यास लागतो. वाढत्य पुरवठ्याकरितां ज्या पदार्थाना' वाढत्या प्रमाणांत खर्च येतो अशा प्रकारचे सर्व पदार्थ या वर्गात येतात.

संपत्तिरूपवस्तूंचा तिसरा वर्ग कारखान्यांतल्या पदार्थाचा होय. संपत्तिरूपवस्तूंमध्यें हाच सर्वात मोठा वर्ग आहे. यांमध्यें मालाचा पुरवठा हवा तितका वाढवता येतो व हा वाढता पुरवठा करण्यास पूर्वीइतकाच खर्च होतो किंवा उलट खर्च कमी कमी येत जातो. या वर्गामध्यें अर्वाचीन काळच्या हजारो वस्तूंचा समावेश होतो. तेव्हां संपत्तिरुपवस्तूंचे तीन वर्ग झाले.

१. ज्याचा पुरवठा नियतपणें मर्यादित आहे अशा वस्तूंचा वर्ग. यांना अवर्धनीय पदार्थ म्हणतां येईल.

२.ज्याचा पुरवठा वाढणें शक्य आहे, परंतु तो वाढण्यास ज्याचा खर्च भूमितिभेटीनें बाढत जातो अशा वस्तु यांना दुर्वर्धनीय पदार्थ म्हणतां येईल.