पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/315

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३०३ ] तेव्हांच ध्यानांत येईल. लिलांवदारानें एखाद्या वस्तूचा लिलांव पुकारला म्हणजे तो त्या वस्तूच्या अगदीं कमी किंमतीपासून प्रारंभ करतो व त्या किंमतीला किती तरी घेवारी ती वस्तु विकत घेण्यास तयार असतात. तेव्ह दुसरा मनुष्य किंमत चढवितो. ही किंमत चढविली म्हणजे पहिल्यापैकीं कांहीं लोक गळतात व राहिलेल्या लोकांत चढाओढ सुरू होते. मग त्यांमधील मनुष्य त्या वस्तूची आणखी थोडीशी किंमत वाढवितो. म्हणजे घेवा-यांपैकीं आणखी लोक कमी होतात असा क्रम एका वस्तूला एक घेवारी राहीतोंपर्यंत चालतो. या उदाहरणावरून किंमत जसजशी जास्त होते तसतशी मागणी कमी होते हें स्पष्टपणें दिसून येतें, व असें होण्याच कारणही उघड आहे. एखादी वस्तु महाग झाली म्हणजे मनुष्याला पैसे जास्त द्यावे लागतात; परंतु मनुष्याजवळ पैसे नियमित असले म्हणजे त्याला कोठें तरी काटकसर करावी लागते. म्हणजे ती महाग माल घेण्याचें पुढे ढकलतो.

किंमतीच्या वाढीबरोबर मालाच्या खपांत चलबिचल होण्याची प्रवृति निरनिराळ्या मलाच्या प्रकारावर अवलंबून आहे. मनुष्याच्या अवश्यकाच्या खपामध्यें फारशी चलबिचल होऊं शकत नाही. धान्य महाग असो स्वस्त असो तें मनुष्य शरीरपोषणास अवश्यक आहे तितकें घेतोच. धान्य महाग झालें तर तो चैनीच्या कांहीं पदार्थाला फांटा देईल. यापेक्षांही धान्य महाग होत गेलं तर सोईच्या गोष्टीला फांटा देईल. यावृरून चैनीच्या मालाच्या खपांत किंमतीच्या फरकानें फारच लवकर चलबिचल होते; सोईच्या मालाच्या खपांत त्यापेक्षां कमी प्रमाणांत होते व अवश्यक मालांत तर खपाची चलबिचल फारच कमी प्रमाणांत होते.

आतां पुरवठ्याच्या नियमाकडे वळू. हा नियम असा आहे" जसजशी मालाची किंमत वाढते ( दुस-या सर्व गोष्टी तशाच आहेत असें धरून) तसतसा मालाचा विक्रीस काढलेला पुरवठा वाढतो; उलटपक्षीं जसजशी किंमत कमी होते तसतसा मालाचा विक्रीस काढलेला पुरवठा कमी होतो."

या नियमामध्यें मालाच्या किंमतीच्या वाढीचा मालाच्या उत्पतीवर काय परिणाम होतो याचा विचार केलेला नाहीं. तो विचार पुढील भागांत करता येईल.