पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भाग चवथा

                     *-*-*-*-*-*-*-*-*
                मागणी व पुरवठा यांचे नियम
                     *-*-*-*-*-*-*-*-*

मागील भागांत 'बाजार' या शब्दाचा शास्त्रीय अर्थ व त्यामध्यें अन्तर्भूत होणा-या कल्पना यांचा विचार केला. आतां बाजारभाव अगर पदार्थांच्या बाजारांतील किंमती कोणत्या तत्वांवर ठरल्या जातात हें पहावयाचें आहे. सामान्य व्यवहारांत बाजारभाव अगर किंमती या मागणी व पुरवठा यांवर अवलंबून आहेत असें म्हणण्याचा परिपाठ आहे व अभिमत अर्थशास्त्रकारांनीं याच सामान्य समाजाला थोडंसें शास्त्रीय स्वरूप देऊन मागणी व पुरवठा हीं किंमतीचीं तत्वें आहेत अगर किंमत ही मागणी व पुरवठा या दोन कारणांचें कार्य आहे असें प्रतिपादन केलें आहे; परंतु पुढील ग्रंथकारांनीं या तत्वावर जेव्हां जास्त बारकाईनें विचार केला तेव्हां या प्रतिपादनांतील एकतर्फींपणा त्यांच्या ध्यानांत येऊन त्यांनीं मागणी, पुरवठा व किंमत या तीन गोष्टींचा परस्पर संबंध जास्त साकल्येंकरून सांगितला आहे. तेव्हां पुरवठा व मागणी यांचें यथार्थ स्वरूप व त्यांचे नियम प्रथमतः ठरविले पाहिजेत. सकृद्दर्शनीं मागणी व पुरवठा हे शब्द् विजातीय आहेत व यामुळे त्यांचें प्रमाण मांडणें अशक्य आहे असें वाटतें. कारण पुरवठा हा शब्द मालाला लावितात तर मागणी हा शब्द गरजू माणसाच्या मानसिक प्रवृत्तीला लावितात. शिवाय मागणी शब्दांतही संदिग्धपणा आहे. मागणी म्हणजे नुसती वासना नव्हे. कारण अशी वासना हव्या त्या माणसास असेल. परंतु किंमतीशीं ज्या मागणीचा संबंध आहे अशी मागणी म्हणजे निवळ वासना नव्हे. खिशांत एक पैही नाहीं असा माणूस बाजारांत गेला व त्याला पुष्कळ वस्तु विकत घेण्याची इच्छा अगर वासना झाली; पण ही निवळ इच्छा म्हणजे पदार्थाची मागणी नव्हे, वासना मागणी या संज्ञेप्रत पावण्यास ती वासना परिणामकारक पाहिजे म्हणजे वासनेबरहुकूम वस्तु विकत घेण्याचें पैशाचें सामथ्य मनुष्यांत पाहिजे तर