पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साधारण मागणीच्या जिनसांचा व्यापार जुगारासारखाच कांहीं अंशीं झाला आहे. शेवटीं अर्वाचीन काळच्या सुधारलेल्या दळणवळणाच्या साधनांना,तारायंत्रें, पोस्ट ऑफिसें वगैरे लवकर बातमी नेणाऱ्या साधनांनीं देशांतील सर्व व्यापाराचें एकीकरण झाले आहे. इतकेंच नाहीं तर हल्लीच्या काळीं सर्व मनुष्यवस्तीचें जग अथवा सर्व सुधारलेले देश या सर्वांचा एक घाऊक बाजारच बनला आहे. यालाच अर्वाचीन अर्थशास्त्रांत जगाचा बाजार म्हणतात व या बाजाराचे जिन्नस म्हणजे सर्व देशांत मागणी असणारे सर्वसाधारण पदार्थ, जसे गहूं, कापूस, राकेल, कोळसा, लोखंड, रेशीम, ताग, गळिताचीं धान्यें, कातडीं वगैरे. हल्लींच्या साधनांनीं सर्व जग एकरूप झाल्यामुळे पदार्थाच्या किंमती-विशेषतः वर दिलेल्या पदार्थांच्या किंमती-एकरूप होण्याचा कल असतो. अमेरिकेंत कापूस कमी पिकणार अशीं चिन्हें दिसू लागल्याबरोबर हिंदुस्थानांत कापूस कितीही पिकलेला असो; परंतु लागलीच त्या कापसाच्या किंमती भराभर वाढतात गेल्या सालीं हिंदुस्थानांत दर वर्षांपेक्षां कापसाचे पीक उत्तम असतांना कापसाला नेहमीपेक्षां जास्त भाव आला. कारण अमेरिकेमध्यें कापसाचें पीक फार कमी आलें होतें. याप्रमाणेच इतर पदार्थांचीही स्थिति आहे. जगाच्या कोणत्याही भागामध्यें संपत्तीच्या उपयुक्ततेमध्यें चलबिचल झाली कीं, त्याचा परिणाम जगांतील इतर देशांतील भावावर झाल्याखेरीज रहात नाहीं. कॅनडामध्यें किंवा रशियामध्यें धान्य कमी पिकलें तर त्याचा परिणाम हिंदुस्थानावर होतो व येथील धान्याचे भाव वाटू लागतात. सारांश, व्यापाराच्या बाबतीत हल्ली सर्व जग एक झालें आहे, व निरानराळ्या देशांचे या बाबतींतील पृथकत्व नाहीसें झालें आहे. याचा परिणाम पदार्थांच्या किमतांवर कसा काय होतो, हें पुढील विवेचनावरून दिसून येईल.