पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/311

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२९९] श्रेणीचे सभासद असल्याखेरीज कोणालाही एखाद्या गांवांत एखादा धंदा करतां येत नसे व मालाच्या किंमती वगैरे ठरविण्याचा अधिकार या श्रेणींना असे. परंतु अशा त-हेचे प्रतिबंध बाजारांत मानले जात नसत. मात्र पूर्वकाळीं बाजारामध्यें एक नियम पाळला जात असे. तो हा कीं, बाजारांत सट्टा करण्याची परवानगी नसे. अर्थात एकाच बाजारांत माल खरेदी करून तो पुन्हा त्याच बाजारांत जास्त दरानें विकण्याची मनाई असे. गि-हाईकांच्या हिताच्या दृष्टीनें हा नियम केलेला असे हें उघड आहे. कारण अशा मनाईच्या अभावीं हुशार व्यापारी सर्व माल खरेदी करून मग हव्या त्या भावानें गि-हाइकांस विकूं लागण्याचा संभव असतो. याकरितां अशी मनाई ठेवणें अवश्य असे व तिची अंमलबजावणी सरकार करीत असे. बाजाराच्या संबंधाचा शेवटचा विशेष म्हणजे काळ व ठिकाणाचा मर्यादितपणा. पूर्वकाळीं बाजार हे विवक्षित स्थळीं व विवक्षित दिवशीं करण्याची वहिवाट असे. अमक्या वारीं अमुक ठिकाणीं बाजार भरावयाचा; दुस-या वारीं दुस-या ठिकाणीं भरावयाचा; असे बाजाराचे दिवस व ठिकाणें ठरलेलीं असत. परंतु अर्वाचीन काळीं या बाजाराच्या कल्पनेंत पुष्कळच बदल झाला आहे. वर सांगितलेंच आहे कीं, देशाच्या औद्योगिक वाढीबरोबर बाजाराचा काळ व ठिकाणाच्या मर्यादा प्रथम नाहीशा झाल्या. कारण देवघेवच फार वाढल्यामुळें संपति उत्पन्न करणें हा जसा सतत चालणारा उद्योग झाला तसाच विनिमय हाही एक सतत चालणारा उद्योग झाला व यामुळे सर्व वारीं व सर्व दिवशीं बाजार भरूं लागले. अर्थात् बाजार ही समाजांत एक कायमची संस्था झाली व बाजार फिरते न राहतां प्रत्येक गांवामध्यें बाजारपेठ म्हणून स्वतंत्र भाग झाला व या ठिकाणीं रोजच्या रोज देवघेवी चालूं लागल्या; व घाऊक बाजार व किरकोळ बाजार असा भेद होऊं लागला. घाऊक बाजार हें संपत्तीचे कारखानदार व घाऊक व्यापारी यांच्या देवघेवीचें ठिकाण झालें व किरकोळ बाजार हें संपत्तीचे उपभोक्ते गि-हाईक व किरकोळ व्यापारी यांच्या देवघेवीचें ठिकाण झाले. घाऊक बाजारामध्यें आतां सर्व लोक व्यवहारज्ञ व श्रीमंत असल्यामुळें सट्टयाच्या मनाईचा नियम नाहींसा झाला व अर्वाचीन काळीं पुष्कळ व्यापारांना सट्याचें स्वरुप आलें आहे. उदाहरणार्थ, हल्लीच्या काळीं कापूस, गहूं, वगैरे सर्व