पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२९४] नाहीं असें अॅडाम स्मिथने प्रतिपादन केले आहे. आतां जेव्हन्सने या दोन कल्पनांमध्ये संबंध आहे असे आपल्या आवशेषिक अगर धारे- वरील मोलाच्या कल्पनेनें ठरविण्याचा प्रयत्न केला आहे.त्याचे मतें वस्तूची किंमत व तिची उपयुक्तता यांमध्ये निकट संबंध आहे असे दाख वितां येईल. मात्र उपयुक्तता हा एक ठराविक व सतत एकरूप असणारा गुण नाही तर त्यामध्ये कमीअधिक तीव्रता असते हे ध्यानांत ठेविलें पाहिजे व ही कमीअधिक तीव्रता मनुष्याजवळ असलेल्या त्या वस्तूच्या पूर्व पुरवठ्यावर अवलंबून आहे. ज्या मनुष्याचे प्राण तहानेने किंवा भुकेने व्याकुळ होत आहेत, त्याला पहिल्या पाण्याचा घोट अगर पहिला अन्नाचा घांस याचा उपयोग अनंत आहे असे म्हटले तरी चालेल व त्याकरितां मनुष्य हवी तितकी किंमत देण्यास तयार होईल. परंतु जसजशी त्याची तहान किंवा भूक हरेल त्या मानाने जास्त पाण्याची व अन्नाची या माणसाला उपयुक्तता कमी भासेल व याच मानाने तो त्याबद्दल कमी कमी किंमत देऊं लागेल. म्हणजे वस्तूची किंमत मनुष्याला अस- लेल्या सामन्य उपयुक्ततेनें ठरत नाही. तर ती आवशेषिक उपयुक्ततेनें ठरते. मनुष्य भुकेने व्याकुळ झाला असतांना जी किंमत धान्याला द्यावयाला तयार होईल ती किंमत तो बाजारांत धान्य घेतांना देणार नाही. कारण जरी धान्याची सामान्यउपयुक्तता पुष्कळ असली तरी त्याचे घरांत धान्य शिल्लक असल्यामुळे त्याला आवशेषिक अगर धारेवरील उपयुक्तता कमी आहे व त्या मानानेच तो त्या वस्तूला किंमत देण्यास तयार होईल. अर्थात उपयुक्तता हा गुण मनुष्याजवळ असलेल्या वस्तूच्या संग्रहा- वर अवलंबून आहे.व जसजसा हा संग्रह वाढेल त्या त्या मानाने जास्त मालाची त्याला मातबरी कमीं वाटेल; इतकेच नव्हे तर कांहीं मर्यादेनंतर ती वस्तु त्याला निरुपयोगी होऊन ती त्याला अडगळ वाटेल. उदाहरणार्थ, शेतकऱ्यास पहिल्या कुदळीचा फारच उपयोग आहे.ती नसली तर त्याचे काम अडेल व याकरितां तो वेळीं जास्त किंमत देईल. दुसऱ्या कुदळीची उपयुक्तता पहिलीइतकी नाही; तिसरीची आहे नाही अशी आहे तर चवथी निवळ अडगळ होईल. यावरून वस्तूची उपयुक्तता मनुष्या जवळ असलेल्या पूर्वीच्या सांठ्यावर अवलंबून आहे हें ध्यानात येईल.