पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/301

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ ૨૮૬] दुसरी वस्तु होय. यावरून एका वस्तूचें मोल दुसरे जितके पदार्थ आहेत तितक्या निरनिराळ्या रूपांनीं सांगतां येईल. एका कोटाचे मोल अमुक बूट म्हणतां येईल किंवा अमुक शेर गहूं म्हणता येईल किंवा अमुक शेर भाजी असें म्हणतां येईल. सारांश, एका वस्तूंचे मोल हजारों रूपांत आहे परंतु वस्तूंची किंमत म्हणजे मात्र एका सर्वसंमत विवक्षित अशा रूपांतील मोल होय. ती विवक्षित वस्तु म्हणजे समाजामध्यें रूढ झालेला पैसा अगर नाणें होय. तेव्हां वस्तूंचे नाण्यांमधील मोल म्हणजे त्या वस्तूची किंमत होय. व इतर सर्व पदार्थाच्या रूपांतील किंमत म्हणजे वस्तूचें मोल होय. तेव्हां वर उल्लेख केल्याप्रमाणें मोल व किंमत यांमध्यें सामान्य विशेषभाव आहे हें उघड आहे. सामान्य व्यवहारांत किंमत या कल्पनेचा प्रचार जास्त आहे व अदलाबदलींत याच कल्पनेला प्राधान्य आहे. कारण वस्तूंची योग्य अदलाबदल अगर विनिमय होण्यास त्याच्या परस्पर किंमती समजल्या पाहिजेत हे सहज दिसून येईलं. परंतु कांहीं कांहीं विषयांमध्यें मोल व किंमत हृा फरक अवश्यक ध्यानांत ठेवावा लागतो हें पुढील भागामधल्या विवेचनावरून दिसून येईल. मोल व किंमत या शब्दांमधील भेदावरून अर्थशास्त्रांतील एक प्रमेय निष्पन्न होतें त्याकडे आतां लक्ष दिलें पाहिजे. पदार्थाच्या किंमती या देशांतील पैशाशीं तुलना करून काढल्या जातात हें वरील विवेचनावरून ध्यानात आलें असेलच. आतां देशाचा पैसा हा कायम आहे असें आपण समजतो व सर्व वस्तूंच्या किंमती या पैशाच्या कसोटीनें मोजतों. यामुळे सर्व वस्तूंच्या सररहा किंमती वाढणें शक्य आहे. कारण पूर्वीपेक्षा जर एका नाण्याच्या बदला सर्व वस्तू कमी मिळू लागल्या म्हणजे सर्व पदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या शोधानंतर व विशेषतः सोन्यारुप्याच्या खाणीच्या शोधानंतर युरोपा मध्यें पदार्थाच्या किंमतीमध्ये विलक्षण क्रांति घडून आली. अर्थात सर्व पदार्थांच्या किमती पूर्वीपेक्षां किती तरी पटींनीं वाढल्या. यावरुन पैशाचे मोल कमी झालें असा त्याचा अर्थ होतो. परंतु पैसा हा कसोटी- सारखा समजल्यामुळे त्याचें मोल स्थिर व अचल आहे असें आपण धरुन १९