पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २६५] संयुक्त सामाजिक पंथाला असें वाटतें कीं, सर्व समाजाची रचना संयुक्त मालमत्तेच्या तत्वावर केली म्हणजे सर्व समाज सुखी होऊन त्या समाजांतील दुःख, हालअपेष्टा व दैन्यावस्था नाहींशीं होतील. हा मार्ग वरवर दिसावयाला चांगला दिसतो, हें खोटें नाहीं. यामुळे प्ले़टोसारख्या तत्त्ववेच्यानें आपल्या उत्तम समाजाच्या चित्रपटामध्यें खासगी मालमत्तेची संस्था नाहींशी करून त्याचे जागीं संयुक्त मालमत्तेच्या कल्पनेची योजना केलेली आहे. परंतु अशा प्रकारच्या योजनेमध्यें मनुष्यस्वभावाचें अज्ञान दिसून येतें. ज्याप्रमाणें कांहीं कांहीं अविवाहित राहिलेलीं माणसें सुखी असतात, नीतिमान् राहतात व लोकोपयोगाचीं कामें करतात; यामुळे ब्रह्मचर्य ही संस्था उत्तम भासते व विवाह ही संस्था गौण व दुःखाची जनयित्री भासते. परंतु वास्तविक मनुष्यस्वभावाकडे पहातां ब्रह्मचर्य ही स्वाभाविक स्थिति नाहीं. तें जोंपर्यंत अपवादादाखल आहे तोंपर्यंत तें प्रशंसनीय भासतें. परंतु तें सार्वत्रिक झालें म्हणजे त्यापासून अनर्थ व अनीति हीं उत्पन्न झाल्याखेरीज राहत नाहींत, असा सर्वकाळीं अनुभव आलेला आहे. तेव्हां सारासार विचार करतां विवाह हीच संस्था मनुष्यस्वभावाला उन्नत दशेला नेणारी व म्हणूनच ब्रह्मचर्यापेक्षां जास्त चांगली संस्था असें म्हणणें प्राप्त आहे. त्याचप्रमाणें खासगी मालमत्ता व संयुक्त मालमत्ता या संस्थांचें आहे. जोंपर्यंत संयुक्त मालमत्ता ही समाजांत अपवादादाखल आहे तोंपर्यंत ती चांगली भासते, व त्याचे सुपरिणाम दिसतात; परंतु ती सार्वत्रिक झाल्यास ती अनर्थावह होऊन समाजाची सर्व सुधारणा नष्ट करील; तेव्हा खासगी मालकीची संस्था हीच एकंदर समाजाची उन्नति करणारी आहे असें म्हणणे प्राप्त आहे. वरील विवेचनावरून अराजक व विध्वंसक पंथांच्याप्रमाणें संयुक्क सामाजिक पंथाची समाजाची सुस्थिति घडवून आणणारी उपाययोजना आत्मघातकीपणाची आहे. व ती वरपांगी सुबक दिसली तरी तिच्या फेलावानें समाजाची उन्नति न होतां व मनुष्याची सुखवृद्धि न होतां उलट समाज रानटी स्थितीप्रत पोंचेल व पुनः बळी तो कान पिळी हाच न्याय सुरू होईल. तेव्हां या पंथाची उपाययोजनाही समंजस व विचारी माणसास पसंत होणार नाहीं हें उघड आहे. .

 समाईक सामाजिक पंथाला खासगी मालकीची संस्था फक्त जंगम मालापुरतीच पाहिजे आहे. परंतु संपत्तीच्या उत्पत्तीचीं सर्व साधनें सरकारच्या