पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/276

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


           भाग सतरावा.
    सामाजिक पंथी योजनांचा सारासार विचार. 
 मागील भागांत सामाजिक पंथाचा इतिहास व त्याचीं निरनिराळी स्वरूपें याची माहिती दिली. आतां या पंथानी सुचविलेल्या योजनांचा विचार या पुस्तकांतल्या शेवटल्या भागांत करावयाचा राहिला. क्रांतिमृलक पंथांनीं सुचविलेले उपाय हे उपाय नसून अपायच आहेत; कारण या पंथाच्या मताप्रमाणें म्हणजे मानवी सुधारणेचें मूळ जी समाजव्यवस्था तीच नाहींशी करणें हाच सर्वोत्तम उपाय होय. या पंथांच्या योजनेंत विधायक असें कांहींच नाहीं. त्यांच्या मतें आहे ही स्थिति मोडून टाका म्हणजे झालें. मग आपोआप चांगली स्थिति उत्पन्न होईल. हे पंथ त्राग्याचे आहेत; एके दृष्टीनें निवळ दैववादी आहेत. तेव्हां त्यांच्या योजनेंत विचाराच्या भागांपेक्षां निव्वळ विकाराचा व त्राग्याचा भाग जास्त असावा हें स्वाभाविक आहे. व अशा पंथाचीं मतें व त्यांचे उपाय कोणत्याही समंजस व विचारी माणसास संमत होणार नाहींत हें उघड आहे. तेव्हां या पंथाच्या उपायांचा विचार सुद्धां करण्याची जरुरी नाहीं.
 संयुक्त सामाजिक पंथानें सुचविलेल्या उपायांचीही बहुतेक वरल्यासारखीच स्थिति आहे. या पंथाला खासगी मालमत्तेची संस्थाच मुळीं नको आहे. या पंथाला सर्व समाजाची संयुक्त मालमत्ता पाहिजे आहे, 'माझें आणि तुझें ' या कल्पना समाजांतून पार नाहींशा व्हाव्या असें या पंथाचे म्हणणें आहे. पूर्वकाळीं धार्मिक कल्पनामुळें अशा लहान लहान संस्था सर्वत्र अस्तित्वांत असत. उदाहरणार्थ, जेसूईट हा रोमन कॅथेंलिक धर्मातील एक पंथ आहे. या पंथांत शिरणाऱ्या मनुष्याला कुटुंब व खासगी मालमत्ता या दोन्ही गोर्टीना मुकावें लागतें. तसेंच, दुसऱ्याही परोपकारी संस्थांमध्यें सार्वजनिक मालमत्तेचा परिपाठ कोठें कोठें दिसून येतो. शिवाय समाजाच्या बाल्यावस्थेमध्यें जमिनीसारखीं संपत्तीच्या उत्पादनाचीं साधनें संयुक्त मालकीचीं होतीं असें दिसतें. या दाखल्यावरून