पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२४५] त्याच्या दुःखाला कारणीभूत होते; ही कृत्रिम अवस्था जाऊन जर सर्व मनुष्यांना त्यांची स्वाभाविक स्थिति प्राप्त झाली तरच मनुष्याचें दास्यत्व जाऊन त्याची सुखवृद्धि होईल असें या पंथाचें म्हणणें आहे. अराजकपंथ व विध्वंसकपंथ हे एका दृष्टीनें मानवी त्राग्यानें उत्पन्न झालेले आहेत. समाजांतील कांहीं वाईट गोष्टींचा मनावर विलक्षण परिणाम होऊन एकंदर समाजच वाईट व देशांतील एकंदर सरकारही वाईट व या दोन्ही संस्था नाहींशा करणें हें आपलें कर्तव्यकर्म आहे व तें पार पाडण्याकरितां गुप्तमंडळ्या स्थापणें व इतर क्रांतिकारक मार्ग यांचा अवलंब करणें अवश्यक आहे असें या पंथाचें मत आहे. परंतु हे पंथ सामाजिक पंथामध्यें कसे अन्तर्भूत होतात हें पुढील विवेचनावरून दिसून येईल. वरील कोष्टकावरून शांतिमूलक सामाजिक पंथाचे चार पोटभेद आहेत असें दिसून येईल. यांपैकीं पहिला पोटभेद म्हणजे व्यक्तिक सामाजिक पंथ होय. औद्योगिक क्रांतीपासून मजूरवर्गाची सांपत्तिक स्थिति फार वाईट झाली आहे व त्यामुळे समाजामध्यें संपत्तीच्या वांटणींत फारच असमता उत्पन्न झाली आहे हें पाहून ही असमता काढून टाकण्यासंबंधींच्या कल्पना व योजना कांहीं परोपकारी व्यक्तींनीं काढल्या. या योजनांनाच व्यक्तिक सामाजिक पंथ असें नांव पडलें. या योजना अमलांत आणण्याची खटपट या व्यक्तींनीं आपल्याच हिंमतीवर केली. मजूरवर्गातील लोकांचीं मनें वळवून आपल्या योजनेप्रमाणें संस्था काढण्याच उपक्रम या लोकांनीं केला. यावरून या पंथाचा असमता नाहींशी करण्याचा मार्ग आपखुषीचा' व खासगी परोपकाराचा होता. या पंथाचीं उदाहरणें पुढें द्यावयाची आहेत त्यावरून या पंथाच्या स्वरूपाचें जास्त स्पष्टीकरण होईल. शांतिमूलक सामाजिक पंथाचा दुसरा पोटभेद राष्ट्रीय सामाजिक पंथ या नांवानें प्रसिद्ध आहे. अर्वाचीन औद्योगिक पद्धतीमुळे समाजामध्यें संपत्तीच्या विषम वांटणीस सुरुवात झाली; परंतु संपत्तीच्या उत्पादनाच्या पद्धतीचा हा अनिवार्य परिणाम आहे व ज्या अर्थी संपत्तीची वाढ होणें इष्ट आहे त्या अर्थी या संपत्तीच्या पद्धतींत फरक घडवून आणणें शक्य नाही; तरी पण कायद्याच्या मदतीनें