पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/254

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


भाग सोळावा. सामाजिक पंथाचा इतिहास व त्या पंथाचे प्रकार. अर्वाचीन काळच्या संपत्तीच्या उत्पत्तीचा विशेष म्हणजे प्रचंड कारखान्यांची पद्धति होय हें मागें सांगितलेंच आहे. याच्या पूर्वीची पद्धति घरगुती धंद्याची होती. या घरगुती धंद्याच्या पद्धतींत समाजांतील बहुतेक वर्गांची सांपत्तिक स्थिति सामान्यतः सारखीच असते. या पद्धतींत अत्यंत श्रीमंत व अत्यंत गरीब असा भेद फारसा होत नाही. परंतु प्रचंड कारखान्यांच्या पद्धतींत श्रीमंत व गरीब यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर पडते. जे लोक श्रीमंत होतात ते अतोनात श्रीमंत होतात व जे गरीब असतात त्यांना खावयाला पुरेसें मिळण्याची पंचाईत पडते. म्हणजे प्रचंड कारखान्यांचा व अर्वाचीन औद्योगिक क्रांतीचा एक परिणाम समाजांतील संपत्तीच्या वांटणींत फार मोठी विषमता उत्पन्न करण्यांत होतो व अशा परिस्थितींत सामाजिक पंथाचा उद्य होतो व युरोपांत झालेला आहे. या ग्रंथाच्या प्रास्ताविक भागांत अर्थशास्त्रांतील निरनिराळ्या पंथांचें वर्णन केलें; त्या ठिकाणीं सामाजिक पंथाचें वर्णन मुद्दाम गाळलें होतें. कारण त्या पंथाचें वर्णन व त्या पंथानें. सुचविलेल्या संपत्तीच्या समतेच्या वांटणीचे उपाय यांचा विचार एकत्र करणें फार सोयीचें होतें. व म्हणून तो विषय हातीं घेण्यास आतांचेंच योग्य स्थळ आहे. तेव्हां सामाजिक पंथ व त्यानें सुचविलेल्या उपायांचा या पुस्तकाच्या शेवटल्या दोन भागांत विचार करून या संपत्तीच्या वांटणीच्या पुस्तकाची समाप्ति करण्याचा बेत आहे. सामाजिक पंथ हा अभिमतपंथांतूनच निघालेला एक स्वतंत्र पंथ आहे.अर्वाचीन काळीं या पंथाच्या संबंधींचें वाङ्मय फार विस्तृत आहे व ती अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखाच झालेली आहे. सामाजिक पंथ हें पद फार अर्वाचीन काळीं उपयोगांत आणलेलें आहे. १८३५ मध्यें इंग्लंडांतील प्रसिद्ध समाजसुधारक ओवेन याने जी एक मजुरांची यानें जी एक परिषद भरवि-