पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २४१] या पेढ्यांच्या प्रसारापासून जर्मनीमध्यें दोन पिढ्यांच्या अवकाशांत गरीब शेतकरी व कामदार यांच्या सांपत्तिक स्थितींत विलक्षण फरक होऊन गेला आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. जेथें पूर्वी पडकीं घरकुलें होतीं तेथें नीटनेटकीं घरें दिसूं लागलीं. ज्या कुटुंबांत सदा उपासमार असे व मुलाबाळांचे हाल असत तेथें हंसतमुख अशा मुलाबाळांनीं भरलेलीं व सुखी कुटुंबें दिसूं लागलीं; जेथें पूर्वी कुटुंबें कर्जात बुडून सावकाराचीं अगदीं गुलामप्राय बनलीं हेातीं तेथें आतां स्वतंत्रपणानें व सुखानें चांगली उत्पन्नाची शेतकी करणारीं स्वावलंबी कुटुंब दिसूं लागलीं. सारांश, जीं ठिकाणें पूर्वी दु:ख, दैन्यावस्था, हालअपेष्टा व रोग यांचीं माहेरघरें होतीं, तींच ठिकाणें आतां लक्ष्मीचीं माहेरघरें बनलेलीं आहेत. जादुगाराच्या कांडीप्रमाणें या सहकारी पतपेढ्यांच्या पद्धतीनें जर्मनींत व इतरत्र जेथें जेथें या पद्धतीचा चांगला प्रसार झालेला आहे तेथें तेथें बहुजनसमाजाची सांपत्तिक स्थिति सुधारलेली आहे यांत तिळप्राय शंका नाहीं. अशा या सर्वतोपरी कल्याणप्रद अशा पद्धतीवर हिंदुस्थानांतही सहकारी पतपेढ्यांचा प्रसार करण्याचें काम आतां सरकारनें हातीं घेतलें आहे. यासंबंधाचा कायदा १९०४ सालीं झाला व तेव्हांपासून अशाप्रकारच्या पतपेढ्यांची वाढ हळूहळू होत चालली आहे; परंतु ती फार सावकाशपणें चालली आहे हें कबूल केलें पाहिजे. हल्लींच्या कायद्यांत काय काय दोष आहेत व या तत्वाचा प्रसार करण्याकरितां आणखी काय काय तजविजी केल्या पाहिजेत हें ठरविण्याकरितां एक कॉन्फरन्स नुकतेंच बसलें होतें. त्यांनीं कांहीं कांहीं फेरफार संघांच्या कायद्यांत सुचविले आहेत व त्यांचा सरकारकडून् अनुकूलदृष्ट्या विचार होईल अशी आशा आहे. या पतपेढ्यांचा मोठ्या प्रमाणावर फैलाव हाच आमच्या शेतकरी व कामकरवर्गास त्यांच्या दैन्यावस्थेंतून वर काढण्याचा मार्ग आहे. म्हणून या तत्वाचा प्रसार करण्याकरितां सरकाराबरोबरच लोकांच्या पुढाऱ्यांनी कयावाचामनेंकरून झटलें पाहिजे तर इष्टकार्य एकदोन पिढ्यांत घडून येईल यांत शंकाच नाहीं. Em ܕܕ ) 、