पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१३]

कॉमवेलने केला व या कायद्याचा इष्ट हेतु लवकरच साध्य झाला. या कायद्यानें हॉलंडच्या व्यापारी वर्चस्वास मोठाच धक्का बसला व इंग्लंडांतील गलबतें बांधण्याच्या व नावाड्याच्या धंद्यास फारच तेजी आली. व त्याच्या अनुषंगानें दुस-याही धंद्यांचा वर पाय निघाला.
 वर सांगण्यांत आलेंच आहे कीं, या उदीमपंथाच्या मताची छाप युरोपातील सर्व राष्ट्रांत बराच काळ टिकली. इंग्लंडामध्यें तर या मताच्या अनुरोधानें झालेले कायदे व जकातीची पद्धति एकोणिसाव्या शतकापर्यंत चालू होती. या मताचा अवशेष म्हणजे इंग्लंडांतील प्रसिद्ध धान्याचे कायदे होत. या कायद्याविरुद्ध चळवळ कॉबडन व ब्राईट या उदारमतवादी मुत्सयांनीं १०।१२ वर्ष केली. तेव्हां एकदां हे कायदे १८४६ त नाहींसे झाले. व उदीमपंथाचा इंग्लंडमध्यें अगदीं बींमोड होऊन खुल्या व्यापाराच्या तत्वाचा पूर्णपणें जय झाला.
 फ्रान्समध्यें उदीमपंथाचा अभिमानी व पुरस्कर्ता कोलबर्ट हा मुत्सद्दी होता हें वर सांगितलेंच आहे. त्यानें आपल्या कारकीर्दीमध्ये कारागिरीला पुष्कळ उत्तेजन दिलें व अशा विशेष प्रकारच्या उत्तेजनानें ते ते कारखाने फ्रान्समध्यें भरभराटीस आले हे खरें. तरी पण या सर्व उदीमपंथी धोरणाचा देशाच्या सांपत्तिक स्थितीवर व बहुजनसमाजावर इष्ट परिणाम न होतां उलटच परिणाम झाला. कारण हे जे नवे कारखाने उभारले गेले त्याकरितां फ्रान्स सरकारला पुष्कळच खर्च आला. व हा सर्व खर्च फ्रान्समधल्या शेतकरीवर्गावर पडला. वास्तविकपणें फ्रान्स हा देश शेतकीला फार चांगला; परंतु या ठिकाणीं युरोपांत लुप्तप्राय झालेली जहागिरीपद्धति ब-याच काळपर्यंत अस्तित्वांत होती. यामुळे आधींच शेतकीसारख्या मोठ्या धंद्याची दैना होती. ह्यांतच कारखाने काढण्यास लागणारा पैसा या हलाख झालेल्या शेतक-यांच्याच बोकांडीं बसला. कारण जहागिरीपद्धतीच्या जुन्या काळच्या नियामानुरूप फ्रान्समधील सरदार, मानकरी, धर्मोपदेशक वगैरे जमीनदार लोक हे करापासून विमुक्त होते. शिवाय फ्रान्समध्यें राजाची सत्ता अनियंत्रित होती. यामुळे राजाच्या दरबारचे लोक व राजाच्या मर्जीतले लोक हे राजाची मर्जी संपादून आपली निरनिराळ्या करांतून मुक्तता करून घेत. सारांश, जहागिरीपद्धतीच्या अवशिष्ट चालींनीं व राजाच्या अनियंत्रित