पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[११]

पदार्थांवर निरनिराळ्या प्रसंगीं निरानराळ्या कारणांनीं जबर जकाती बसविलेल्या होत्या व यामुळे अॅडम स्मिथचें वर्णन कांहीं अंशीं त्या काळीं तरी उदीमपंथाला लागू होते. शिवाय अॅडम स्मिथ हा उदीमपंथाचा विरोधक होता व त्याच्या पुस्तकाचा एक हेतु उदीमपंथाच्या मतांचें व धोरणाचें खंडन करणें हा होता. यामुळे त्याचें वर्णन एकतर्फी व एककल्ली व्हावें व त्याला उदीमपंथांत कांहीं एक ग्राह्यांश नाहीं असें वाटावें हें स्वाभाविक होत.
 परंतु एकोणिसाव्या शतकांत ऐतिहासिक पद्धतीला प्राधान्य मिळालें व प्रत्येक शास्त्राचा पूर्व इतिहास व पूर्व पीठिका तत्कालीन कागदपत्रांवरून व लेखावरून निःपक्षपातबुद्धीनें ठराविण्याचा प्रवात सुरू झाला व त्यामुळेच या पंथाबद्दलही पुष्कळ नवी माहिती उपलब्ध झाली व कनिंगहॅमसारख्या औद्योगिक चळवळीच्या इतिहासकारांनीं या पंथाबद्दल पुष्कळ विश्वसनीय माहिती मिळवून या पंथाचें यथार्थ स्वरूप जगापुढें आणिलें व या विस्तृत माहितीचा अलीकडील अर्थशास्त्राच्या इतिहासकारांनीं आपल्या इतिहासांत उपयोग केला आहे. त्यावरून असें दिसतें कीं, उदीमपंथाच्या प्रवर्तकांचें आपलें औद्योगिक धोरण ठरविण्यांत चार राष्ट्रीय हेतू होते. ते हेतू हे:-
 १. देशांतील कलाकौशल्यांना उत्तेजन देणें व होतां होईल तों देशांतील कच्च्या मालाचा पक्का माल तयार करून परदेशीं पाठविणें.असा पक्का माल देशांतल्या देशांत झाल्यानें देशांतील मजूर व कारागीर यांना भरपूर काम मिळतें व पक्क्या मालाला कच्च्या मालपेक्षां किंमत पुष्कळच जास्त येत असल्यामुळे तो सर्व फायदा देशांतील व्यापा-यांस व कारखानदारांस मिळतो.
 २. देशाच्या संरक्षणास व सामर्थ्यास देशामध्यें नावाड्यांचा मोठा वर्ग असणें व मोठं व्यापारी आरमार असणें जरूर आहे. याकरितां होड्या, बोटी व गलबतें बांधण्याच्या धंद्यास व त्यास लागणाऱ्या दुसऱ्या धंद्यास उत्तेजन देणें. तसेंच मासेमारीच्या धंद्यास मदत करणें व दर्यावर्दी लोकांस साहाय्य करणें. अशायोगानें देशांत नावाड्याचा वर्ग तयार होइल व व्यापारी आरमारही सज्ज राहील.
 ३. परचक आलें असतां देशांतील लोकांना दुस-याच्या तोंडाकडे