पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ २०९ ]

याच्या कारणांकडे कांहीं लेखकांचें लक्ष गेलें व भांडवलाच्या उत्पत्तीच्या पद्धतीमुळें ही विषमता उत्पन्न होते; तेव्हां ही संपत्तीची उत्पत्तिपद्धतिच बदलली पाहिजे अशा प्रकारचे विचारही कांहीं लोकांचे मनांत येऊं लागले. औद्योगिक क्रांतीमुळेंं समाजांत ही जी नवीन जागृति उत्पन्न झाली त्यानें सामाजिक पंथ या नांवाचा एक निराळाच अर्थशास्त्रांतला पंथ निर्माण झाला व या पंथानें मजुरांची स्थिति सुधारण्याकरितां पुष्कळ उपाय सुचविल. या पंथानें अर्थशास्त्राची नवीं तत्त्वे निर्माण करून त्या अन्वयें समाजांतील लोकांच्या सांपत्तिक कल्पनांमध्यें सुधारणा घडवून आणून तद्दारांं मजुरांची स्थिति सुधारण्याच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे अशी हांकाटी सुरू केली. कांहींजणांनीं कायद्याच्या आश्रयानें मजुरांची स्थिति सुधाण्याचा प्रयत्न केला व तो लवकरच यशस्वी झाला हें पुढील विवेचनावरून दिसून येईल.
 तसेंच शिक्षणाच्या प्रसासनें मजूरवर्गामध्यें औद्योगिक क्रांतीनें घडून आलेल्या आपल्या दुःस्थितीबद्दल जाणीव उत्पन्न झाली व त्यांनीं स्वप्रयत्नांनीं आपल्या सुधारणेचे पुष्कळ स्वावलंबनाचे मार्ग शोधून काढले. सामाजिकपंथाचा इतिहास व त्यानें सुचविलेले मार्ग यांचा विचार पुस्तकांतले शेवटल्या दोन भागांत करण्याचा आहे. स्वावलंबनाचे प्रकार ह्मणजे मजुरांचे संघ, त्यांचे संप व सहकारित्व होय. या तीन उपायांचा तीन निरनिरांळ्या भागांत विचार करावयाचा आहे. तिसरा मार्ग म्हणजे कायद्याच्या योगानें ताबडतोब मजुरांची स्थिति सुधारण्याचे प्रयत्न करणें हा होय. हा विषय फारसा कठिण नसल्यामुळें त्याचा या भागांतच विचार करूं.
 वर सांगितलेंच आहे कीं, औद्दोगिक क्रांतीच्या काळचे दुष्परिणाम लोकांच्या नजरेस येऊ लागल्यापासून ते नाहींसे करण्याचे प्रयत्न परोपकारी लोकांनीं सुरू केले व ते यशस्वी होण्यास एकच अडचण होती. ती ही कीं, त्या काळीं अँँडाम स्मिथचें खुल्या व्यापाराचें तत्व सर्वमान्य होत चाललें होतें. अॅडम स्मिथचें पुस्तक प्रसिद्ध झालें त्या काळीं प्रचंड कारखान्यांच्या पद्धतीला कोठें सुरुवात होऊं लागली होती. त्याचे काळीं बहुतेक धदे घरगुती स्थितींतच होतें. यामुळें त्याला प्रचंड कारखान्यांची वाईट बाजू दिसणें शक्य नव्हतें. प्रत्येक मनुष्याला आपलें
 १४