पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/218

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२०८]

व शक्तीवर अनिष्ट परिणाम झाला. कारण झपाट्यानें वाढणाऱ्या शहरांत घाण वाढणें अनिवार्य होतें. दाट वस्तीनें घरेंही मोकळ्या हवेचीं राहणें शक्य नव्हतें. मजुरांना प्रचंड कारखान्याच्या इमारतींत दिवसाचा पुष्कळ भाग राहावें लागे व या इमारती अत्यंत काटकसरीनें बांधल्या गेल्यामुळें मजुरांच्या आरोग्याच्या दृष्टीनें त्या वाईट असत. यामुळें मजूर लोकांमध्यें निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊं लागला. शिवाय सृष्टिशतीच्या योगानें पुरुषांच्या श्रमाचें महत्व कमी झालें खरें. पण त्यामुळें बायकामुलांच्या श्रमाला किंमत आली. घरगुती धंद्यांच्या पद्धतींत विशेष श्रमाचीं कामें धट्याकट्या पुरुषांखेरीज होत नसत. परंतु कारखान्यांतील निरनिराळ्या यंत्रांशीं काम करणें याला शक्तीपेक्षां लक्षच जास्त लागत असल्यामुळें हीं कामें बायकांकडून व मुलांकडून सहज होण्याजोगीं असल्यामुळें कारखानदार बायकांमुलांचे श्रम जास्त पसंत करीत. कारण त्यांना मजुरी कमी द्यावी लागे. परंतु या बाबतींत कोणतेच नियम नसल्यामुळें अगदीं कोंवळया मुलांनाही कामावर नेमीत. तसेंच बायकांना व मुलांना किती तास काम द्यावयाचें किंवा कारखाने किती वेळ चालावयाचे यासंबंधी निर्बंध नव्हता.
 सारांश, या औद्योगिक क्रांतीच्या काळांत पूर्वींची ठरीव पध्दति जाऊन नवीन पद्धति उत्पन्न होत होती. परंतु या संक्रमणावस्थेमध्यें सर्वथा सामाजिक बेबंदशाही झाली. पूर्वींचे ठरलेले नियम व चाली या निरुपयोगी झाल्या. नवीन चालीरीति किंवा नियम ठरले नव्हते. यामुळें कारखानदारांच्या स्वार्थीपणास पूर्ण मुभा मिळाली. कारण मजुरांचा वर्ग गरजू होता. नव्या मनूंत त्यांना परावलंबन प्राप्त झालें होतें व कारखानदारांना पैशाच्या उबेमुळें फाजील स्वातंत्र्य व सत्ता आलेली होती. या दोहोंचा परिणाम मजुरवर्गाच्या दैन्यावस्थेमध्यें व्हावा हें अगदीं स्वाभाविक होतें; व एकीकडे देशाची भरभराट होत जावी तर एकीकडे समाजांतील मोठा वर्ग याची स्थिति खलावत जावी अशी विरोधी स्थिति येऊन ठेपली. हा विरोध परोपकारी लोकांच्या ध्यानांत आल्यावांचून राहिला नाहीं व औद्योगिक क्रांतीच्या या अनिष्ट परिणामांकडे पुष्कळ लोकांचे लक्ष गेलें व हे अनिष्ट प्रकार सरकारनें काढून टाकले पाहिजेत अशाबद्दल चळवळ सुरू झाली.समाजांत ही विषमता कां उत्पन्न होते