पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१९२] यांच्यामध्यें केली पाहिजे. कारण या दोन वर्गांचे काम व सामाजिक दर्जा एकच असतो व अशा दृष्टीनें पाहिलें म्हणजे फ्रान्समधले मिराशी शेतकरी इंग्लंडांतील शेतकरी मजुरांपेक्षां जास्त सुखी व संपन्न असतात यांत काडीभरसुद्धा शंका नाहीं. ही छोटी मिराशी शेतकीपद्धति प्रचंड शेतीपेक्षां जास्त किफाईतशीर नाहीं हें दाखविण्याकरितां एक प्रमाण कांहीं अर्थशास्त्रकार पुढे करीत असतात. तें हे कीं, मिराशी शेतकरी दर एकरी जितकें भांडवल व विशेषत: जितके श्रम यांचा खर्च करतात तितकें भांडवल व तितके श्रम दर एकरीं प्रचंड शेतींत खर्चीं पडत नाहींत व ते जर तितके खर्चींं पडतील तर छोट्या शेतीपेक्षां प्रचंड शेतीपासूनच उत्पन्न जास्त होईल. तेव्हां अर्थशास्त्रदृष्ट्या छोटी शेती प्रचंड शेतीपेक्षां जास्त किफाईतशीर नाही; परंतु या कोटिक्रमांत एक चूक अशी आहे कीं प्रचंड शेतामध्यें इतके श्रम खर्चीं पडणें अशक्य असतें. कारण त्या शेतींत कोणाचाच निकट संबंध नसल्यामुळे असे जीवापाड श्रम व भांडवलाची योग्य योजना होऊं शकत नाहीं. ही श्रम व भांडवलाची यांची योजना मिराशी पद्धतीनें जणूं कांहीं उत्पन्न केली जाते व म्हणून जास्त झालेलें उत्पन्न या पद्धतीचें फळ होय असें मानण्यास हरकत नाही. ही पद्धत नसती तर जें शेतीचें उत्पन्न अस्तित्वांत येऊं शकलें नसतें तें उत्पन्न या पद्धतीचाच परिणाम होय यांत शंका नाही. शेवटीं या पद्धतीचा जो एक सामाजिक परिणाम आहे तो लक्षांत घेतला असतां ही पद्धतीच एकंदरींत श्रेयस्कर आहे असें म्हणणें भाग आहे. प्रचंड शेतीमध्ये देशामधला बराच मोठा वर्ग भाडोत्री शेती-मजुरांचा असतो. हा वर्ग कारखानदार-शेतक-यांवर सर्वस्वी अवलंबून असतो॰ या वर्गाला स्वतःच्या जबाबदारीवर काम करण्याची संवय नसते. हा वर्ग निव्वळ भाडोत्री व सांगकाम्या बनतो. यामुळें या वर्गाच्या दानतीवर परावलंबनाचा छाप बसतो; व स्वाभाविकच यांचा सामाजिक दर्जा कमी होतो. परंतु छोटया शेतीमध्ये प्रत्येक मिराशी शेती हा स्वतःचा मालक असतॊ. तो कोणाचा ताबेदार नसतो . त्याला सर्व व्यवहार आपल्या जबाबदारीवर करावे लागतात. यामुळें त्याच्यामध्यें कित्येक नैतिक गुण उत्पन्न होतात; हिंमत, स्वावलंबन, जबाबदरीची,