पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१९०]

काम संपलें मग त्या शेताचे किंवा पिकाचें कांहीं का होईना; त्याबद्दल त्यांना मुळींच फिकीर नसते. शिवाय हे भाडोत्री मजूर आज या शेतावर काम करणार तर उद्या त्या शेतावर काम करणार, तेव्हां शेताबद्दल त्यांन कांहीं आपलेपणा वाटण्याचें कारण नसतें. शेताशीं संबंध असलेल्या या तीन वर्गांचा अशा प्रकारचा भाव असल्यामुळें शेतीचें काम जितक्या काळजीनें, जितक्या मेहनतीनें व जितक्या कळकळीनें व्हावयाला पाहिजे तितक्या काळजीनें, तितक्या मेहनतीनें व तितक्या कळकळीनें तें होत नाही. यामुळे यांचा शेतीमध्यें जरी यंत्रादि सामग्रीपासून व वर निर्दिष्ट केलेल्या दुस-या गोष्टींपासून फायदा होतो तरी या जिव्हाळ्याच्या अभावापासून बरेंच नुकसान होतें व म्हणूनच शेवटीं छोट्या शेतीपेक्षां त्यांचें उत्पन्न सरासरीनें कमीच पडतें.
 परंतु छोट्या शेतींत मालक, शेतकरी व कसणारा या सर्व व्यक्ति एकवटलेल्या असतात. व जमीन आपली आहे, तिची सुधारणा केल्यास, तिची मशागत केल्यास, त्याचा फायदा आपल्यास मिळवावयाचा आह इतकेंच नव्हे तर ही जमीन आपल्या मुलाबाळांना पुढें जावयाची आहे अशी जाणीव छोट्या शेतींत शेतक-यांच्या मनांत नित्य वागत असते. आतां अशी मालकीची कल्पना ही एक अजब चीज आहे. आर्थर यंग म्हणून एक प्रवासी शेतकरी होऊन गेला. त्यानें असें म्हटलें आहे की, "Magic of property will turn sand into gold" "मालकीची भावना ही एक जादुगाराची कांडी आहे. कारण त्या कांडीनें रेतीचें सोनें होतें" म्हणजे आपण श्रम केले तर त्या श्रमाचें फळ आपल्याला व आपल्या मुलाबाळांना मिळेल अशी खात्री असली म्हणजे मनुष्य फार काळजीनें व फार कळकळीनें जीवापाड श्रम करतो. अशा मिरासदार शेतकऱ्यांच्या श्रमांत व भाडोत्री मजुरांच्या कामांत जमीन-अस्मानचें अंतर पडतें म्हणूनच यंत्रादि सामग्रीचा जरी या शेतक-यांना फायदा घेतां येत नाहीं तरी सुद्धां त्यांच्या जीवापाड मेहनतीनें त्याचा सर्व वचपा निघून येतो व हे मिरासदार शेतकरी आपल्या शेतांतून आपल्याला जास्त उत्पन्न काढतात इतकेंच नाहीं तर जमिनीची कायमची सुपीकता वाढवितात. या मिराशी पद्धतीचे सुपरिणाम फ्रान्स, इटली,वगैरे देशांत दिसून येतात. तेथील शेतांची उत्तम मशागत केलेली आहे असें त्या प्रांतीं