पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१८९]

ण्याचे पंप वगैरेसारख्या सोयी प्रचंड शेतीलाच फक्त शक्य असतात. शिवाय प्रचंड शेतीमध्यें देखरेखीचा खर्च उत्पन्नाच्या मानानें अर्थात कमी बसतो. १०० एकरांचे शेताला जितका देखरेखीचा खर्च येतो तितकाच बहुतेक २०० एकरांच्या शेताला खर्च येतो. मेंढ्यांचा कळप १०० चा असला काय किंवा २०० चा असला काय मेंढपाळ एकटाच पुरतो. शिवाय प्रचंड शेतीमध्यें कुंपणें,रस्ते वगैरेंमध्यें जमीन कमी जाते व यायोगानेंही शेताचें उत्पन्न वाढतें; शेवटीं प्रचंड शेतींत शास्त्रीय व खर्चाचीं खतें यांचा उपयोग करण्यास सांपडतो. छोट्या शेतीमध्यें यांपैकीं एकाही गोष्टीचा फायदा घेतां येत नाहीं. यामुळे अर्थशास्त्रदृष्टया प्रचंड शेती ही छोट्या शेतीपेक्षां जास्त फायद्याची आहे अशा तऱ्हेचें मत पुष्कळ अर्थशास्त्रकारांनीं दिलेलें आहे. व वरील कारणें सयुक्तिक असल्यामुळे हें मत खरें आहे असें वाटतें. परंतु कांहीं अर्थशास्त्रकार व विशेषतः मिल्ल हे या मताच्या विरुद्ध आहेत. त्यांचे मतें छोटी शेती हीच प्रचंड शेतीपेक्षां सर्व दृष्टीनी जास्त श्रेयस्कर आहे. कारण जरी प्रचंड शेतीमध्यें वर नमूद केलेले फायदे असतात तरी त्यांमधला एक दोष फार मोठा आहे. प्रथमतः या पद्धतींत शेताचा मालक, शेतीच्या लागवडीची जबाबदारी घेणारा शेतकरी व शेत कसणारे प्रत्यक्ष मजूर हे तिन्ही वर्ग निराळे असतात. यापासून बरेच अनिष्ट परिणाम शतीवर घडतात. शेताचा मालक कांहीं वर्षांच्या करारानें व ठरलेल्या खंडानें आपली जमीन शेतकरी-कारखानदारास देतो. या शेतकऱ्याचा हेतु आपल्या कराराच्या मुदतींत आपला जितका फायदा करून घेतां येईल तितका करून घेण्याचा असतो. यामुळें त्याचें जमिनीच्या भावी स्थितीकडे लक्ष नसतें. जमीन आपल्या उपयोगानंतर बिनकस होवो किंवा बिघडो त्याला त्याची पर्वा नसते. आपण आणलेल्या भांडवलावर आपल्याला चांगलें व्याज मिळून ठरलेल्या मुदतींत आपलें भांडवलही परत मिळावें एवढाच त्याचा मतलब असतो. शिवाय हा शेतकरी स्वत: शेत कसणारा नसतो. तर तो शेताची लागवड मजुरांकडून करून घेतो. हे मजूर तर बोलून चालून भाडोत्री आणलेले. त्यांना जमिनीची काळजी असणें शक्यच नाही.त्यांचें पाहणें इतकेंच कीं,साधारण मजूर काम करतात तितकें काम करून आपली मजुरी मिळवावयाची.ही मजुरी मिळाली कीं त्यांचें