पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/197

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१८७]

परिणाम पाहून ही पद्धति नाहींशी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत व १९०३ सालीं जो कायदा झाला त्यानें तर कालेंकरून ही पद्धति जाऊन मिराशी पद्धति सर्व आयर्लंडभर पसरेल असें म्हणण्यास हरकत नाहीं. या पद्धतीचा विशेष असा आहे कीं, यामध्यें जमीनदार आपल्या जमिनी अत्यंत दरिद्री व उपजीविकेचें दुसरें साधन नसलेल्या व जवळ भांडवल नसलेल्या अशा कुळांना चढाओढीच्या तत्वावर खंडानें देतात. जमिनी थोड्या लोकांच्या मालकीच्या व चढाओढ करणारीं कुळें अनन्यगतिक व असंख्य; या स्थितीमुळें या पद्धतींत जमिनीचा खंड जबर असतो. केव्हां केव्हां जमिनीमध्यें प्रत्यक्ष पैदास होणा-या उत्पन्नापेक्षां ठरलेला खंड जास्त असतो अशींही उदाहरणें दिसून येतात. कारण कांहीं तरी शेताचा तुकडा लागवडीस मिळण्याच्या आशेनें कुळांना पाहिजे तो जबर खंड कबूल करून जमिनी भाड्यानें घ्याव्या लागतात. परंतु इतका खंड देण्याचें त्यांना अर्थातच अशक्य असतें. यामुळे या पद्धतींत शेतकरी किंवा कुळें हीं जमीनदारांचीं नेहमीं ऋणी असतात. कारण खंडाची बाकी फिटण्याची कधींच आशा नसते. यामुळें आयरिश शेतकरी अत्यंत हलगर्जी व बेपर्वा झाले आहेत. शेतांत जास्त पिकलें काय किंवा कमी पिकलें काय त्यांना सारखेच. कारण आयुष्याला अत्यंत जरूर इतक्या उत्पन्नापलीकडे त्यांना शेतांतून मिळणें शक्यच नसतें. कारण त्यावरचें सर्व उत्पन्न जमीनदार अगर त्याचा गुमास्ता घेऊन जातो. यामुळे आयर्लंडांतील शेतक-यांची अत्यंत दैन्यावस्था असते. कारण या कृषिपद्धतीने त्यांची स्थिति सुधारणेंच अशक्य होतें व ज्या लोकांना चांगल्या राहणीची कल्पना नसते त्यांचेमध्यें लग्नासंबंधी दूरदर्शींपणा असत नाहीं. यामुळे त्यांची स्थिति नेहमीं अत्यंत हीनदीन अशी राहते. तेव्हां ही उपरी कुळाची पद्धति बहुतेक दासकृषि व दासकल्पकृषिइतकीच वाईट आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. कारण कर्जबाजारी कुळें जमीनदाराचे बहुतेक गुलामच बनतात. त्यांना शेतींत सुधारणा करण्याची इच्छा होत नाहीं. ते स्वतः अगदीं कगाल राहतात व आपली स्थिति सुधारण्याची आशा नसल्यामुळे पिढ्यानुपिढ्या अशी कंगाल प्रजा निर्माण होत रहाते. या पद्धतीचे दोष काढून टाकणें ह्मणजे शेतक-यांचें जमीनदारांवरील परावलंबन नाहींसें करून त्यांना स्वतःच्या मालकीच्या जमिनी करून