पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१८६]

ही वांटणी चढाओढीनें ठरत नाहीं तर ती देशाचारानें व रूढीनें ठरलेली असते व ती वारंवार बदलत नाहीं. या पद्धतीमध्यें कुळास शेताची मशागत चांगली करण्यास हुरुप असतो. कारण शेताचें उत्पन्न वाढल्यास त्याचा अर्धा वांटा त्याला मिळावयाचा असतो. परंतु या पद्धतीमध्यें जी शेतीची सुधारणा होते ती अंगमेहनतीनें काय होईल ती होईल. शास्त्रीय ज्ञान व भांडवल यांनी घडून येणारी सुधारणा या पद्धतींत फारशी शक्य नसते. कारण जमिनीचा मालक शेतीकडे स्वतः देखरेख करीत नसल्यामुळे जमिनींत जास्त भांडवल घालण्यास कचरतो. शिवाय । पद्धतीमध्यें पुढील भागांत वर्णन करावयाचा मिराशी पद्धतीइतका जमिनीबद्दल आपलेपणा कुळास वाटत नाहीं हें कबूल केलें पाहिजे व मिरासदार शेतक-याइतकी मेहनत या अर्धेली कुळाकडून होणें शक्य नाहीं हेंही कबूल करणें भाग पडेल.
 परंतु ज्या ज्या देशांत ही अर्धेल-तिर्धेल पद्धति सुरू आहे त्या त्या ठिकाणची शेती चांगल्या स्थितींत आहे इतकेंच नाहीं तर तेथला शेतकरीवर्ग सुद्धां सुखवस्तु आहे. कोणताही प्रवाशी इटालीभर फिरला तर त्याला त्या देशांतील व्यवस्थित टापटिपीच्या सुंदर शेतीच्या लागवडीचें कौतुक वाटल्यावांचून रहात नाहीं. तेथलीं शेतें ह्मणजे सतत माळ्याचा डोळा व हात ज्यांवर फिरत आहे अशा सुंदर बगीच्याप्रमाणें दिसतात असें प्रवाशी सांगतात हा सर्व प्रभाव कुळांना आपल्या जमिनीबद्दल स्थाईकपणा वाटतो.याचा होय. ही अर्धेली कुळें उपरी कुळें नसतात.शिवाय खंड हा रूढीनें ठरल्यामुळे चढाओढीने वारंवार बदलण्याचा संभव नसतो. यामुळें शेतकऱ्यांस आपल्या शेताची मशागत करण्यास हुरूप व हौस असते. याप्रमाणें ही जमीनधाऱ्याची पद्धति एकंदरींत बऱ्याच वरच्या पायरीची आहे यांत शंका नाही. मिराशी पद्धति मात्र यापेक्षांही चांगली इतकेंच; कारण त्या पद्धतींत शेतकरी हा शेताचा सर्वस्वी मालक असल्यामुळें शेताचें सर्वच उत्पन्न त्याला मिळावयाचें असतें. येथें उत्पन्नाचे हिस्से पडावयाचे नसतात. यामुळे शेतक-यांस आपल्या शेताच्या मशागतींत व सुधारणेंत आपलें श्रम-सर्वस्व घालण्यास बुद्धि होते.
 दुसरी पद्धति आयर्लंडांतील आहे. तिला उपरी कुळाची पद्धति म्हणतां येईल. गेल्या कांहीं वर्षांपासून इंग्रज सरकारनें या पद्धतीचे वाईट