पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/195

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१८५]

झाली. कांहीं ठिकाणीं जमीनदार व कुळें असा संबंध राहिला; परंतु कुळें ऐनजिनसी खंड देऊं लागलीं. आतां या निरानिराळ्या पद्धतीचा अर्थशास्त्रदृष्ट्या विचार करावयाचा आहे तो पुढील भागावर टाकणें इष्ट आहे.

भाग आठवा.

अर्धेलीची कृषिपद्धति.

 अर्थशास्त्रांतील बराच वादग्रस्त प्रश्न ह्मणजे प्रचंड शेती चांगली किंवा छोटी शेती चांगली हा होय. परंतु या प्रश्नाच्या आधीं एका लहानशा भागांत युरोपांतील कांहीं प्रदेशांत प्रचलित असलेल्या दोन पद्धतींचें वर्णन देणें इष्ट होईल. यांतील पहिली पद्धति ह्मणजे अर्धेल-तिर्धेल पद्धति होय.
 ही पद्धति इटाली देशांत विशेष प्रचारांत आहे. तसेंच ती फ्रान्स, स्वीत्झर्लंडचा कांहीं भाग, व हॉलंड वगैरे देशांतही चालू आहे. प्रवास केलेल्या पुष्कळ लोकांच्या मतानें ही पद्धति पुष्कळच वरच्या दर्ज्याची आहे यांत शंका नाही; व इटालीमध्यें शेतकीची सुधारणा या पद्धतीच्या योगान झालेली आहे. तसेंच या पद्धतीमध्यें शेतकरीवर्गही चांगला सुखी व संपन्न असा दृष्टोत्पत्तीस येतो. या दृष्टीनें ही पद्धति अर्थशास्त्रदृष्ट्याही प्रशंसनीय आहे हें कबूल केलें पाहिजे.
 या पद्धतीचा विशेष हा आहे कीं, यामध्यें जमीनदार व कुळें यांचा निकट संबंध राहून एकमेकांचे हितसंबंध विरोधी नसून परस्परावलंबी असतात. या पद्धतींत जमीनदार हा शेतावरील इमारती व शेतलागवडीस लागणारें भांडवल कुळास आपण पुरवितो व कूळ आपले श्रम देतो. व शेतांत जें उत्पन्न होईल त्याची वांटणी रूढ़ीनें ठरलेल्या प्रमाणानें होतें; कांहीं प्रांतांत व कांहीं भागांत उत्पन्नाचा अर्धा वांटा मालकास जातो व अर्धा कुळास राहतो; कोठें कोठें मालकांस तिसरा हिस्सा व कुळास दोन हिस्से जातात. आणखीही निराळ्या प्रमाणानें वांटणी होते. परंतु उत्पन्नाची