पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/18

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.[६]

व कलाकौशल्याचीं कामें तेच गुलाम करीत; यामुळें उद्योगधंदे व व्यापारउदीम हीं हलक्या दर्ज्याची कामें अशी ग्रीक नागरिकांमध्यें दृढ़ समजूत होती. त्यांच्या मताप्रमाणें नागरिकांस योग्य असे धंदे म्हणजे शिपाईगिरी व राज्यकारभार. ग्रीक लोकांमध्यें प्रजासत्ताक राज्यपद्धति असल्यामुळे नागरिकांचा बहुतेक वेळ राजकीय उलाढालींत जात असे. ह्यामुळे त्या लोकांमध्यें इतिहास व राजनीति या शास्त्राचा उदय झाला. या विषयांत त्यांनीं इतकी पारंगतता मिळविली कीं, ग्रीक लोकांसारखे प्रख्यात इतिहासकार,प्रख्यात मुत्सद्दी व प्रख्यात राजनीतिकोविद फारच थोड्या राष्ट्रांच्या वांट्याला आलेले आहेत. परंतु ज्याप्रमाणें आमच्यांत जातिभेद व संसाराची असारता ह्या कल्पनांमुळे अर्थशास्त्राचा उदय होऊं शकला नाहीं त्याप्रमाणेंच ग्रीक लोकांतील गुलामगिरी व त्यांची उद्योगधंद्याबद्दलची तुछाताबुद्धि यांच्यायोगाने अर्थशास्त्राचा उदय त्या लोकांत होऊ शकला नाहीं.
 वरील विवेचनावरून ज्या शास्त्राची पूर्वपीठिका आपल्यास पहावयाची आहे तें शास्त्र फार जुनें नाहीं हें तेव्हांच ध्यानांत येईल. परंतु इतर शास्त्रांच्या इतिहासाचे तीन काळ कल्पिण्याचा युरोपियन ग्रंथकारांचा रिवाज आहे. त्याला अनुसरून अर्थशास्त्राच्या इतिहासकारांनीही अर्थशास्त्राच्या इतिहासाचे तीन काळ कल्पिले आहेत. एक ग्रीक व रोमन लोकांच्या सुधारणेचा जुना काळ; दुसरा क्रिश्चन व रोमन कॅथलिकधर्माच्या प्रसाराचा व वाढीचा मध्यकाळ व तिसरा प्राटेस्टंटधर्माच्या उदायापासुंचा अर्वाचीन काळ.
 ग्रीक व रोमन लोकांमध्यें गुलामगिरीच्या प्रघातामुळे अर्थशास्त्राचा उदय होऊं शकला नाहीं हें वर सांगितलेंच आहे. परंतु ग्रीक लोकांनीं समाजशास्त्र व राजनीतिशास्त्र यांची चांगली वाढ केली होती; व या शास्त्रांच्या प्रमेयांचा विचार करतांना प्रसंगोपात ग्रीक तत्वज्ञान्यांनीं अर्थशास्त्रविषयक काही तत्वांचा उल्लेख केला आहे. व अर्थशास्त्राच्या इतिहासकारांनी या उल्लेखांचा एकत्र संग्रह करून त्यालाच अर्थशास्त्राची पूर्वपीठिका मानली आहे. ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो यानें "प्रजासत्ताक राज्य" म्हणून एक नामांकित ग्रंथ लिहिला आहे.त्यामध्ये श्रमविभाग या अर्थशास्त्राच्या एका तत्वाचें सुंदर तऱ्हेंनें वर्णन केले आहे. त्याप्रमाणेच अॅरिस्टॉटल याने आपल्या सुप्रसिद्ध "नीतिशास्त्र व राजनीतिशास्त्र ?" या ग्रंथामध्यें