पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१६९]

 युरोपामध्यें फार काळपर्यंत व्याजबट्टा करणें म्हणजे अधर्म समजला जात असे व हा धंदा ज्यू लोक करीत. यामुळे क्रिश्चन मनुष्याच्या मनांत ज्यू लोकांबद्दल इतका तिट्कारा व वीट भरलेला असे हें वर सांगितलेंच आहे. व या धंद्याबद्दल समाजामध्यें तिरस्कार बुद्धि असल्यामुळे अॅडाम स्मिथनें सांगितलेल्या मजुरीच्या व नफ्याच्या बाबतींतील विशिष्ट कारणानुरूप ज्यू लोक व्याजही जबर घेत. हें जबर व्याज ह्मणजे कांहीं अशीं तिरस्कृत धंद्याबद्दलचा मोबदला असे. उद्योगधंदे याची वाढ झाली नाहीं अशा समाजाच्या बाल्यावस्थेंत संपत्ति उसनी किंवा कर्जाऊ घेण्याचे प्रसंग ह्मणजे मनुष्याला अवश्य असणा-या गरजा भागविण्याकरितां येणार. अर्थात् या काळीं संपत्तीच्या उत्पत्तीला भांडवलाची फारशी जरुरी नसे. तर संपत्ति तात्कालिक उपयोगाकरितां हवी असे. कोणाला खायला नाहीं म्हणून दुस-यापासून उसनें घेण्याचें कारण पडे, किंवा दुस-या अशाच अकल्पित प्रसंगीं दुस-याची मदत लागे. अशा वेळीं कर्जाबद्दल किंवा उसन्या वस्तूबद्दल व्याज मागणें म्हणजे प्रसंगांत असलेल्या माणसापासून नाडून फायदा करून घेण्यासारखे असे. व 'शेजा-यास मदत करीत जा' या धर्मवचनास धाब्यावर बसविल्यासारखें असे. अर्थात समाजाच्या बाल्यावस्थेंत संपत्ति उसनी किंवा कर्जाऊ देणें म्हणजे आपल्यास नको असलेल्या वस्तूचा दुस-यास उपयोग करून देणें होय व हें एक मनुष्याच्या नैतिक कर्तव्याचाच भाग समजला जात असे. या समजामुळें व्याज मागणें हें क्रूरपणाचें व अन्यायाचें भासे. परंतु जसजशी समाजाची प्रगति होत जाते तसतशी संपत्ति उत्पादनाकरीतां भांडवलाची जास्त अवश्यकता लागूं लागते व कर्ज काढण्याचा मुख्य हेतू अधिक संपत्ति उत्पन्न करणें हा असतो व जर दुस-याच्या भांडवलाचा उपयोग करून एकानें आपल्याला नफा करून घेतला तर त्या नफ्याचा कांहीं अंश भांडवलाच्या मूळ मालकांस देणें हें अगदीं रास्त आहे असे दिसून येतें. ह्मणूनच पूर्वकाळीं सुद्धां कर्ज उसने देणारानें व्यापारांतील धोक्याचा वाटेकरी होण्याचें कबूल केल्यावर मग व्याज घेण्याबद्दल समाज आड येत नसे. कारण अशा स्थितींत उसने देणारा हा एक व्यापारांतला भागीदारच होई व जरी व्याजाबद्दल लोकमत प्रतिकूल होतें तरी पण नफ्याबदल ते कधींही प्रतिकूल नव्हतें.