पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/177

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ १६७]

विकणें व निवळ उपयोग विकणें या दोन गोष्टी भिन्न आहेत. ज्याप्रमाणें जमीन खंडानें दिली म्हणजे खंड सतत येतो व शेवटीं आपली जमीन परत मिळते; त्याचप्रमाणें भांडवलाचेंही आहे. व्याज भांडवलाच्यां उपयोगाचा मोबदला आहे व म्हणून शेवटीं उसनें घेतलेलें भांडवल परत करणें अवश्यक आहे. शेवटीं उसनें देणाराला उसनें घेणा-याला मिळालेल्या वस्तूपेक्षां जास्त संपत्ति मिळते व ह्मणून व्याज घेणें गैर आहे. याला उत्तर असें आहे कीं, खरोखरी उसनें देणाराला जास्त फायदा होतो असें नाहीं. समजा,आज अनें बपासून १०० रुपये घेतले व ते पांच वर्षांनीं परत द्यावयाचें कबूल केलें. आज हातीं असलेल्या १०० रुपयांची किंमत ५ वर्षांनीं हातीं येणा-या रुपयांच्या पेक्षां जास्त आहे हें उघड आहे. कारण सद्यःकालीन वस्तु भावि वस्तूपेक्षां जास्त किंमतीची आहे हें स्पष्टच आहे. म्हणून जेव्हां अ आपल्या हातांत असलेली प्रत्यक्ष वस्तू बला देतो तेव्हां तो बला जास्त किंमतीची वस्तू देतो व म्हणून पांच वर्षांनीं बनें नुसते शंभर रुपये देणें रास्त नाहीं, तर रुपयांच्या प्रत्यक्षपणाच्या जास्त किंमतीचा मोबदला अला दिला पाहिजे, ती मोबदला अला व्याजाच्या रूपानें मिळतो.
 येथपर्यंत व्याजाचें सामान्य स्वरूप व त्याविरुद्ध असलेल्या आक्षेपांचा विचार झाला. आतां व्याजाच्या दराबद्दल विचार केला पाहिजे. प्रत्येक देशांत व्याजाचे दर पुष्कळ असतात व हे पुष्कळ दर असण्याचें कारण भांडवल परत मिळण्याच्या हमीचा कमीअधिकपणा हें होय. जो मनुष्य अगदीं भुकेबंगाल आहे, ज्याला उसने पैसे दिले त परत करण्याची शक्ति नाहीं अशा माणसाला कर्जाऊ पैसे मिळत नाहींत, मिळालेच तर जबर व्याजानें मिळतात. कारण धनकोला आपलें भांडवल अजीबाद बुडण्याची भीति असते. यामुळें जबर व्याजाच्या आशेनें फक्त ती पैसे कर्जाऊ देण्यास तयार होतो. म्हणजे ज्या माणसाची पत कमी त्याला कर्जाऊ रकमेवर व्याज जास्त द्यावें लागतें. परंतु जेथें कर्ज परत मिळण्याची पूर्ण खात्री असते तेथें व्याजाचा दर एकच असतो, तोच त्या काळच्या सामान्य व्याजाचा दर असें समजलें जातें; सर्व औद्योगिक बाबतींत पुढारलेल्या देशांमध्यें सरकार व म्युनिसिपालिट्यासारख्या सार्वजानिक संस्था या नेहमीं कर्ज काढतात व यांना सर्वांत कमी व्याजानें पैसे मिळतात, अशा कर्जरोख्याचें जें व्याज तें उत्तम हमीवरील कर्जरोख्याचें व्याज समजलें जातें.