पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१६६]

आहे. ज्याप्रमाणें जमिनीच्या उपयोगाचा मोबदला म्हणजे खंड होय; त्याप्रमाणें भांडवल व सामान्यतः त्याचें स्वरूप जो पैसा त्याच्या उपयोगाचा मोबदला म्हणजे व्याज होय. खंड व व्याज यांच्या स्वरूपामध्यें याप्रमाणें साम्य असलें तरी त्यांच्या नियमांमध्यें व समाजांतील त्यांच्या वाढीच्या नियमांमध्यें जमीनअस्मानचें अंतर पडतें हें पुढील विवेचनावरून दिसून येईल.
 उसन्या दिलेल्या भांडवलावर अगर पैशावर व्याज घेणें हें पापाचें कृत्य आहे असा बराच काळपर्यंत युरोपामध्यें समज होता. कारण ही गोष्ट धर्माची एक बाब होती."नफा मिळविण्याच्या बुद्धीनें उसनवार पैसा देऊं नको" या अर्थाची कांही वाक्यें बायबलांत सांपडतात. यावरून व्याजबत्ता करणें हें क्रिश्चनधर्माच्या मनुष्यास अयोग्य आहे असा समज उत्पन्न झाला. यामुळें क्रिश्यनधर्मी बहुतेक देशांत व्याज घेणें किंवा बट्टा करणें हें गैरकायदा कृत्य मानलें जात असे. हा धंदा बहुधा ज्यू लोक करीत व या कारणामुळे क्रिश्चन लोक ज्यू लोकांना इतकें तुच्छ मानीत; व त्यांचा द्वेष व तिट्कारा करीत. बायबलांतील प्रत्येक निषेधपर विधानाशिवायआणखीही कांही प्रमाणांवरून व्याज घेणें अयोग्य आहे असें त्या काळीं पाद्री लोकांनी ठरविले होते. उदाहरणार्थ, पैसा हा वांझ आहे; पैसा पैशाला कांही वीत नाही; म्हणून उसन्या दिलेल्या पैशाबद्दल व्याज घेणें म्हणजे जेथें पेरले नाही तेथून उत्पन्न काढण्यासारखें आहे. हे आरिस्टाटलचें मत क्रिश्चन पाद्री व्याजाविरुद्ध युक्तीचें प्रमाण म्हणून पुढें करीत असतं. याला उत्तर असें देतात कीं, खरोखरी पैसा उसना दिला जातो असें नाहीं, तर उत्पादक भांडवल उसनें दिलें जातें व भांडवलापासून अधिक संपत्ति उत्पन्न होते हे सिद्धच आहे व त्यापैकीं एक हिस्सा भांडवल उसने देणारास देणें रास्तच आहे. दुसरा मुद्दा हा कीं, आपल्याजवळ शिल्लक असलेला पैसा उसना देण्यांत मनुष्याचा कोणताही तोटा होत नाहीं म्हणून त्याबद्दल व्याज मागणें गैर आहे. याला उत्तर असें आहे कीं, पैसा शिल्लक टाकण्यास मनुष्यास कांहीं तरी उपभोग कमी करावे लागतात व या त्याच्या मेहनतीबद्दल त्याला कांही तरी मोबदला मिळणें रास्त आहे.
 व्याजाचें सातत्य गैर आहे. कारण मनुष्यानें सतत व्याज दिलें तरी मुद्दल कायमच राहतें हा अन्याय आहे. याला उत्तर असें आहे कीं,मालकी हक्क