पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१६५]

जर दुस-यास खंडानें दिली तर त्याला पूर्वीच्या उत्पन्नाइतका खंड येणार नाहीं. कारण आतां त्या उत्पन्नांतून श्रमाची मजुरी कमी होईल व त्याला जमीनदार म्हणून कायतो खंड मिळेल. हीच स्थिति नफ्यासंबंधीं आहे. भांडवल व त्याची योजना हीं एका व्यक्तीचीं असलीं तरी वस्तुतः भांडवलाचा मोबदला निराळा असते. त्याला व्याज ह्मणतात व योजनेचा मोबदला निराळा असतो त्याला नफा म्हणतात. तेव्हां व्याज व नफा हे संपत्तीचे दोन निराळे वांटे आहेत असें समजणें शास्त्रीयदृष्ट्या रास्त आहे प्रत्यक्ष व्यवहारांत व व्यापाऱ्यांच्या जमाखर्चातही हा भेद नेहेमीं ठेवलेलां असतो. जरी कारखानदाराचें स्वत:चें भांडवल असलें तरी कारखान्याचा नफातोटा पाहतांना कारखानदार भांडवलाचें व्याज हें कारखान्याच्या खर्चापैकीं एक बाब धरतो व माल विकून खर्चवेंच जाऊन मग राहील ती शिल्लक नफा म्हणून समजतो. तेव्हां या भागांत आपल्यास व्याजाच्या स्वरूपाचा व त्याच्या दराचा विचार करावयाचा आहे.
 अर्थात् व्याज म्हणजे भांडवलाच्या उपयोगाकरितां दिलेली किंमत होय. भांडवलाच्या स्वरूपांचा विचार करतांना भांडवलाचे तीन वर्ग होतात असें सांगितलें आहे. उत्पन्नी भांडवल, उत्पादक भांडवल, उपभोग्य भांडवल व या तिन्ही भांडवलांच्या प्रकारामध्यें भावी वासनांच्या तृप्तीकरितां सद्यःकालीन उपभोग लांबणीवर टाकणें ही सामान्य कल्पना आहे असें दाखविलें आहे. ह्मणजे भांडवलामध्यें आत्मसंयम हा गुण दृग्गोचंर होतो व व्याज हें या आत्मसंयमनाचा एक प्रकारचा मोबदला आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. कोणत्याही माणसानें उत्पन्न केलेल्या संपत्तीचा तात्कालिक उपभोग न घेतां ती शिल्लक टाकली म्हणजे त्यानें भांडवल उत्पन्न केलें असें आपण समजतों; तेव्हां भांडवल हें एक प्रकारें श्रमाचेच फल आहे. प्रत्यक्ष उत्पन्न केलेली वस्तु आपण शिल्लक टाकतों असें मात्र नव्हे. कारण या वस्तू नश्वर असतील किंवा फार वेळ टिकणा-या नसतील. तेव्हां आपण जी शिल्लक टाकतों ती पैशाच्या रुपाने टाकतों. व भांडवल याचा सामान्यतः आपण पैसा असाच अर्थ करतों. व हें भांडवल आपल्या मालकीचें असतांना जेव्हां त्याचा उपयोग करण्याकरितां आपण दुस-यास देतों तेव्हां या आपल्या मालकीच्या वस्तूच्या उपयोगाचा मोबदला म्हणून आपण व्याज घेतों. यावरून व्याज हें खंडाच्याच स्वरूपाचें