पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/174

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग पांचवा.

व्याज.

देशांतील संपत्तीचा तिसरा मोठा वांटा म्हणजे व्याज होय. अभिमत अर्थशास्त्रकारांचीं संपत्तीचीं, जमीन, श्रम व भांडवल, अशीं तीनच कारणें सांगण्याचा सांप्रदाय असल्यामुळे देशांतील संपत्तीचे या कारणपरत्वें वांटेही तीन होतात असें त्यांनी प्रतिपादन केलें आहे; व त्या वांट्याला त्यांनीं नफ़ा हें नांव दिलें आहे व या नफ्याची तीन अंगे असतात असे त्यांनीं सांगितलें आहे. कारण भांडवल हे काटकसरीनें उत्पन्न होतें; व या काटकसरीचा मोबदला भांडवलवाल्यास मिळाला पाहिजे. तसेंच भांडवलवाला कारखाना चालवून स्वतः मेहनत करतो. त्याबद्दलही त्याला मोबदला मिळाला पाहिजे. शिवाय प्रत्येक धंद्यांत भांडवल हडपण्याचा कमीअधिक संभव असतो; तेव्हां या धोक्याबद्दलही त्या भांडवलवाल्याला कांही तरी किफायत पाहिजे असते. या तीन गोष्टी मिळून नफा बनतो.
 याप्रमाणें अभिमतअर्थशास्त्रकारांनीं नफा हा शब्द व्यापक अर्थाने उपयोगांत आणिला आहे. परंतु या ग्रंथाच्या दुस-या पुस्तकांत संपत्तीर्ची चार कारणें मानणें कसें आवश्यक आहे हे दाखविलेंच आहे. प्रत्येक सुधारलेल्या देशांत भांडवलवाला व कारखानदार हे एक नसतात व जरी ह्या व्यक्ति एक असल्या तरी भांडवल व संपत्तीच्या सर्व कारणांचें एकीकरण करून संपत्ति उत्पन्न करणें या दोन गोष्टी अगदीं भिन्न आहेत व ह्मणून त्याचे वांटे निरनिराळे समजणें इष्ट आहे. ज्याप्रमाणें लहान प्रमाणावर शेती करणारा शेतकरी हा जमीनदार असतो व मजूरही असतो व त्याला शेताचें जें उत्पन्न येतें त्याचे प्रत्यक्ष जरी दोन वांटे केले नाहींत तरी शेतकऱ्याला जें उत्पन्न येतें ते दोन नात्यांनी येतें; एक जमिनीचा मालक ह्मणून व एक जमीन कसणारा म्हणून, व अशा शेतकऱ्यानें आपली जमीन