पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१६३]

तात अशांना मजुरी जास्त द्यावी लागते. वकील व डॉक्टर यांचेवर हीं विश्वासाचीं कामें टाकावयाचीं असतात. डाकतरचे हातांत तर मनुष्याचें जीवित असतें व वकिलाचे हातांत मालमत्ता असते. यामुळेंही या धंद्यांतील मजुरी जास्त असावी लागते.
 पांचवें-धंद्यांतील यशस्वीपणाचा संभव कांहीं धंद्यांत फायदा होणें न होणें हें निवळ तवकलीचें काम असतें. ह्मणून अशा धंद्यांची मजुरी जास्त असते. उदाहरणार्थ, सोन्याच्या खाणीचा धंदा;मासेमा-याचा धंदा;चिताऱ्याचा धंदा; नटाचा धंदा व वक्त्याचा धंदा व नाटकें लिहिणाराचा धंदा; या धंद्यांमध्यें यश येणें न येणें हें आधीं सांगतां येत नाहीं. दहा माणसांतील एक मनुष्य उत्तम चितारी बनतो किंवा नट बनतो किंवा उत्तम वक्ता बनतो, यामुळे जो विजयी होतो त्याला अकल्पित पैसे मिळतात. ही जी एका व्यक्तीला मिळकत होते ती खरोखरी दहा बारा लोकांचे श्रम वायां जातात त्यांपासून होते. ह्मणून या ठिकाणीं सुद्धां ह्या धंद्यांतील एकंदर श्रम त्रास व व्यासंग यांचा खर्च पाहिला ह्मणजे मजुरी जास्त होते असें नाहीं. तरी पण ज्याचें नशीब उदयास येतें त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त फिरतो व त्याची मजुरी मग सामान्य मजुरीच्या प्रमाणाबाहेर जाते.
 वरील सर्व कारणांचा संकलित परिणाम असा होतो कीं, निरनिराळ्या धंद्यांतील मजुरी व नफे हे सदोदित निरनिराळे राहतात. चढाओढीच्या पूर्ण अमदानीत सर्व मजुरीचा दर व सर्व नफा सारखा होण्याचा कल असतो खरा. तरी पण वर निर्दिष्ट केलेल्या कारणांनीं चढाओढीचा प्रभाव कमी होतो व मजुरीचे दर व नफा यांना कांहीं अंशीं रूढीच्यासारखें रूप येतें. तरी पण एकंदरींत खऱ्या मजुरीकडे पाहिलें ह्मणजे मजुरीच्या सामान्य उपपत्तीला या कारणांनीं बाध येत नाहीं, हें निर्विवाद आहे.

--