पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/170

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१६०]

असें नाही; तर मजुरीच्या सरासरी दराची मीमांसा या दृष्टीनेंही या कल्पनॅत पुष्कळ वैगुण्य आहे असें आक्षेपकांचें म्हणणें आहे. ते हे की, मजुरीचा सरासरी दर लोकसंख्या व भांडवल या दोन कारणांवरच अवलंबून आहे असें नाहीं तर तो मजुरांच्या कर्तबगारीवर अवलंबून आहे . इंग्लडमध्यें रशियापेक्षां मजुरीचा सरासरीचा दर पुष्कळच जास्त आहे. याचं कारण इंग्लंडमध्यें भांडवल जास्त व लोकसंख्या त्या मानानें कमी एवढेच नव्हे ; तर इंग्लंडचे मजूर कर्तबगारीत रशियन किंवा आयरिश मजुरांपेक्षां जास्त आहेत. यामुळे त्यांच्या श्रमानें मालाची पैदासच पुष्कळ होते व ह्मणूनच मजुरांच्या वांट्यास अधिक मजुरी येते.
 तसेंच शेतकीमध्यें चढत्या पैदाशीच्या अवस्थेंत मजुरांच्या वाढीबरोबर शेतकीच्या उत्पन्नाची किती तरी वाढ होते; यामुळे मजुरांची मजुरी वाढते. कारण संपत्तीची दर माणशी वाढ जास्त होते व ह्मणूनच श्रमांचा मोबदलाही दर माणशीं वाढतो; अर्थात् मजुरीचा दर वाढतो.
 तसेंच वर दाखविलेंच आहे कीं, मालाचा खप वाढला ह्मणजेही मजुरीचा दर वाढतो.
 आतां निर्दिष्ट केलेल्या सर्व कारणांचा विचार केला म्हणजे लोकसंख्या व भांडवल यांपेक्षां मालाची पैदास हें मजुरीच्या दराचें विशेष महत्वाचें कारण भासू लागतें व यामुळेच कांहीं अर्थशास्त्रकारांनीं 'मजुरीफंडाची कल्पना' मजुरीच्या दराची मीमांसा या नात्यानें अजीबाद टाकाऊ आहे असें ठरवून मजुरीचे दर हे मालाच्या पैदाशीवरच अवलंबून आहेत, अशा प्रकारची मीमांसा केली आहे. ह्मणजे मजुरीचा दर हा सामान्यतः मजुरांच्या श्रमाच्या फलावर अवलंबून आहे. ज्यांच्या श्रमापासून जास्त उत्पन्न होतें त्यांस जास्त मजुरी मिळते ज्यांच्या श्रमापासून कमी उत्पन्न होतें त्यांस मजुरी कमी मिळते. या मीमासेचा परिणामही मजुरांची सांपत्तिक स्थिति सर्वाशीं त्यांच्याच हातीं आहे असे ह्मणण्यांत आहे, जर एखाद्या देशांत मजुरीचे दर फारच कमी असले तर तो क्षेप मजुरांचाच आहे. कारण त्यांची कर्तबगारी कमी असल्यामुळे त्यांच्या श्रमापासून मालाची उत्पत्तिच कमी होते व म्हणून त्यांच्या वाट्यास कमी संपत्ती येते.
 ही ही कल्पना मजुरीफंडाच्या कल्पनेप्रमाणें एककल्लीच आहे.