पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१५५]

येणार नाहीं. उदाहरणार्थ, शहरांत एखाद्या मनुष्याला दरमहा पंचवीस रुपये मिळत असले व खेड्यामध्यें एखाद्यास पंधरा रुपये मिळत असले, तर नांवाच्या मजुरींत दोहोंमध्यें जवळजवळ दुपटीचा फरक आहे; तरी खेडेगांवांतल्या माणसाचीच खरी मजुरी शहरांतल्या माणसांपेक्षां जास्त असूं शकेल. शहरांतल्या मनुष्यास २५ रुपये मिळत असतील. परंतु त्याला जागेकरितां ३ किंवा ४ रुपये भांडें द्यावें लागेल; तेंच खेडेगांवांत तितकीच जागा १॥ रुपया भाड्यानें मिळेल; तसेंच शहरांत लांकूडफाटा महाग असेल तर या खेडेगांवांत तें फारच स्वस्त असेल. शहरांत ज्या वस्तूबद्दल पैसे द्यावे लागतात त्या वस्तु खेड्यांत मोफत मिळत असतील. सारांश, नांवाच्या मजुरीवरून खऱ्या मजुरीचा अंदाज करणें बरोबर नाहीं. शिवाय मजुरांस मजुरीचा कांहीं भाग पैशाच्या रूपानें मिळत असेल तर कांहीं भाग प्रत्यक्ष गरज भागविणाऱ्या पदार्थाच्या रुपानें मिळत असेल. तेव्हां अशा मजुरांच्या मजुरीच्या दराचा विचार करतांना या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, घरगुती मजुरांना जेवणखाण मालकाच्या घरीं मिळतें. याशिवाय वर पगार मिळतो; कांहीं नोकरांस नुसता कोरडा पगार मिळतो कोंकणांत मजुरांना अडेसरी नांवानें धान्याच्या रूपानें मजुरी देण्याचा प्रघात आहे. शिवाय वर्षास एक घोंगडी, एक पायतण व दोनचार लंगोट् हे मिळतात व वर्षाचे दहावीस रुपये रोख मिळतात. म्हणजे त्यांची संपूर्ण मजुरी या तीन गोष्टींची बेरीज मिळून होते. तेव्हां नांवाची मजुरी व खरी मजुरी या मधील फरक चांगला ध्यानांत ठेवला पाहिजे. नांवाच्या मजुरीचा दर पुष्कळ असला म्हणजे मजुरांची सांपत्तिक स्थिति चांगलीच असली पाहिजे असें मात्र नाहीं. या म्हणण्याची सत्यता आमच्याइकडील लंकेंत सोन्याच्या विटा! या म्हणीवरून चांगली दिसून येते. म्हणजे जरी लंकेत मजुरास रोजची एक सोन्याची वीट मजुरीदाखल मिळाली तरी त्याला पोटापुरतें अन्न मिळण्यास सोन्याच्या विटाच द्याव्या लागतात, सारांश, जेथे पैसा अत्यंत विपुल असतो तेथें मजुरीचा दर पुष्कळ असतो तरी पण सर्वच पदार्थांची इतकी महागाई असते कीं जास्त मजुरी अवश्यक वस्तूंच्या विक्रीतच खर्च होते व मजुराला आयुष्यांतील सोयी किंवा चैनी उपभोगण्यास सांपडत नाहींतच.असो.