पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/161

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१५१]

कारण खंड बिनखंडी जमीन व दुसरी जमीन यांच्या उत्पन्नामधील फरकावरच अवलंबून आहे असें उपपत्तींत म्हटलें आहे. यावर आक्षेप असा आहे कीं कोणत्याही देशांत बिनखंडी जमीन कधीही नसते. प्रत्येक मालकीच्या जमिनीला कांहींना कांहीं खंड मिळालाच पाहिजे. म्हणून रिकार्डोची उपपत्ति ही खंड या सांपत्तिक गोष्टीची कारणमीमांसा नव्हे, असाही त्याच्या पुढील आक्षेप आहे. या ग्रंथकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खंड हा उत्पन्न कां होतो, तर जमीन ही खासगत मालकीची गोष्ट आहे व ती मर्यादित आहे, या दोन कारणांनीं खंड उत्पन्न होतो. तेव्हां खंड किंवा भाडें हें खासगत मालकीच्या संस्थेचा परिणाम आहे. जेव्हां एकाच्या मालकीच्या वस्तूचा उपयोग दुस-यास देण्यांत येतो तेव्हांच भाडें घेण्यांत येतें तेव्हां खासगत मालकी हें भाड्याचें खरें कारण आहे व म्हणून देशामध्यें जरी एकाच मगदुराची व समानसुपीकतेची जमीन असली-परंतु ती जर खासगी मालकीची असली-तरी सुद्धां भाडें किंवा खंड उदयास येईल.परंतु रिकार्डोच्या उपपत्तीप्रमाणें अशा स्थितींत भाडें हा सांपत्तिक प्रकार उदयास येऊंच नये.
 या आक्षेपास रिकार्डोच्या विधानावरून बराच आधार मिळतो असें कबूल करणें भाग आहे. खंड हा जो एक प्रकार आहे, तो कमीअधिक सुपीकतेमुळें होतो असें रिकार्डोच्या विधानावरून वाटतें खरें; तरी पण खंडाची रक्कम ही जमिनीच्या मगदुरावरून ठरते असें म्हणण्याचा त्याचा रोंख आहे. शिवाय देशाच्या नवीन वसाहतीच्या स्थितीचें वर्णन करतांना रिकार्डोनें ही मालकीची कल्पना अप्रत्यक्षपणें आणिली आहे. देशाच्या प्राथमिक स्थितींत भाडें निर्माण होणारच नाहीं. कारण जोंपर्थत देशामध्यें बिनमालकीची मुबलक जमीन पडलेली आहे तोंपर्यंत मालकीच्या उपभोगाबद्दल कोण भांडें देईल, असा रिकार्डोनें प्रश्न विचारला आहे, यावरून खंड किंवा भांडें हा प्रकार मुळीं मालकीपासून निर्माण होतो असें रिकार्डोच म्हणणें होतें, असें म्हणण्यास हरकत नाही. मात्र या खंडाची रक्कम ठरण्यास व ती कमीअधिक होण्यास लागवडीची धार कारण होतें, असें त्याचें म्हणणें आहे.
 पहिल्या आक्षेपांत जास्त सत्यांश आहे. ज्या ज्या देशांत खासगी मालकीची संस्था आहे त्या त्या ठिकाणी बिनखंडी जमीन असणें शक्य