पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१४८]

कारण श्रम न करतां त्याचें भाडयाचें अगर खंडाचें उत्पन्न देशाच्या सुस्थितीबरोबर आपोआप वाढत जातें. निवळ लोकसंख्येच्या वाढीनें जी जमीनदारांची खंडाच्या उत्पन्नाची वाढ होते त्याला मिल्लनें अनुपार्जित वाढ असें ह्मटलें आहे व ज्या अर्थी जमीनदारांना ही वाढ त्यांच्या श्रामाखेरीज मिळते, त्या अर्थी तिचा बराचसा वांटा सरकारला मिळणें रास्त आहे. कारण लोकसंख्येची वाढ ही सुव्यवस्थित राज्यपद्धतीमुळेंच होते. तेव्हां जमीनदारांच्या या अनुपार्जित वाढीवर जर कोणाचा हक्क असेल तर तो सरकारचा आहे व म्हणून जमिनीवर कर बसवून ही वाढ सरकारनें आपल्या उत्पन्नाची एक बाब करावी ह्मणजे प्रत्येक सरकारच्या वाढत्या खर्चाला एक आपोआप वाढणारी उत्पन्नाची बाब तयार होऊन सामान्य जनांवरील कराचें ओझें कमी होईल; अशी मिल्लची विचारसरणी आहे.
 वरील विवेचनावरून रिकार्डोच्या भाड्याच्या उपपत्तीची बरीचशी कल्पना वाचकांस होईल असें वाटतें. ही उपपत्ति 'उपपत्तीं'च्या पुस्तकांत उतरत्या पैदाशीचा जो एक सिद्धांत सांगितलेला आहे त्यावर बसविलेली आहे हें उघड आहे. प्रत्येक देशामध्यें उत्तम सुपीक जमीन थोडीच असते व त्या सुपीकतेची मर्यादा संपल्यानंतर उतरत्या पैदाशीच्या नियमास सुरुवात होते असें मागल्या एका भागांत दाखविलें आहे.परंतु रिकार्डोनें उतरत्या पैदाशीचा नियम जमिनीस सदासर्वदाच लागू आहे असे गृहीत धरून त्यावर बसवलेली भाड्याची उपपत्ति ही सर्व काळीं व सर्व ठिकाणीं सारखीच लागू आहे असें ठाम मत ठोकून दिले. वास्तविकपणें रिकार्डोची उपपत्ति इंग्लंडच्या त्या काळच्या परिस्थितीवरून वरून काढली होती व इंग्लंडपुरती ती सर्वथा खरीही होती.यांत शंका नाही. कारण इंग्लंडमध्यें मोठमोठे जमीनदार आहेत. व ते जमीनदार स्वत: न कसतां खंडानें आपल्या जमिनी शेतक-यांस देतात व हे शेतकरी म्हणजे चांगले भांडवलवाले लोक असून ते शेतकीमध्यें इतर धंद्याप्रमाणें फायदा मिळविण्याकरितां आपलें भांडवल शेतकींत घालतात व त्यांच्याप्रमाणें जमिनीच्या खंडाबद्दल चढाओढ असून संर्वजमिनीचा खंड याप्रमाणें चढाओढीनें ठरत असतो व तो खंड बहुतेक रिकार्डोच्या उपपत्तीशी जुळतो हें खरें आहे . परंतु वर निर्दिष्ट केलेल्या सर्व गोष्टी जेथें अस्तित्वांत नाहींत तेथें रिकार्डोची उपपत्ति खोटी ठरते.ही उपपत्ति व