पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/157

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१४७]

अशी जमीन होय. व देशांतील बाकीच्या सर्व जमिनीचा खंड या बिनखंडी जमिनीवरील उत्पन्न व त्या त्या जमिनीचें उत्पन्न यामधील वजबाकीनें ठरतो.
 वरील विवेचनावरून असें दिसून येईल कीं, खंडाच्या या उपपत्तीपामन तीन प्रमेयें निष्पन्न होतात. एक देशांतील जमीन ही उत्तम मगदुरापासून कनिष्ठ मगदूर या क्रमानेंच लागवडीस येते व कमी मगदुराच्या जमिनीची लागवड होण्याचें कारण लोकसंख्येची वाढ हें होय;व त्या संख्येच्या गरजेनुरूप धान्याच्या किंमतीची वाढ हें होय. तेव्हां देशाची लोकसंख्या प्रथम वाढते. या वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनें धान्याची किंमत वाढते व ही धान्याच्या किंमतींतील वाढ कायम राहिली म्हणजे शेतक-यास कमी मगदुराची जमीन लागवडीस आणणें परवडतें. परंतु धान्याची किंमत कमी झाल्यास लागलीच लागवडीच्या धारेवरील जमीन शेतक-यास परवडत नाहींशी होते व ती जमीन तो टाकून देतो व यामुळे बाकीच्या जमिनीचे खंडही कमी होतात. परंतु जेथपर्यंत लोकसंख्या वाढत जात आहे-व सर्व सुव्यवस्थित देशांत लोकसंख्या वाढत जातेच-तेथपर्यंत धान्याच्या किंमती वाढत जातात व धान्याच्या किंमती वाढत चालल्या ह्मणजे लागवडीची धार खालीं उतरत येते. व मग जमीनदारांचीं भाडीं अगर खंड वाढत जातात.
 या खंडाच्या उपपत्तीपासून रिकार्डोनें देशांतील लोकांच्या सांपत्तिक स्थितीबद्दल जीं अनुमानें काढलीं आहेत, त्यावरून त्या उपपत्तीचें त्याला इतकें महत्व कां वाटत असे हें दिसून येईल. कोणत्याही देशाची जसजशी भरभराट होत जाते तसतशी त्याची लोकसंख्या वाढत जाते व जसजशी लोकसंख्या वाढत जाते तसतशा धान्याच्या किंमतीही वाढत जातात. व धान्याच्या किंमतीमध्यें कायमची वाढ झाली ह्मणजे देशांतील बहुजनसमाजाची रहाणी जास्त खर्चाची होते. कारण त्यांच्या गरजांपैकीं अत्यंत अवश्यक गरज जी धान्य ती मिळविण्याकरितां त्याला उत्पन्नाचा बराच भाग खर्च करावा लागतो. देशांतील बराच मोठा वर्ग केवळ मजुरीवर राहणारा असतो. धान्याच्या किंमतीच्या कायमच्या वाढीनें या वर्गाचे हाल जास्त वाढतात. मात्र या देशाच्या भरभराटीबरोबर जमीनदार लोकांचा खंड सारखा वाढत जातो व त्यांची स्थिति सुधारत जाते.