पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१४२]

लेल्या देशांत चढाओढीच्या तत्वावर होऊं लागली आहे. हल्लींच्या काळीं निव्वळ रूढींकडे पाहून कोणीच चालत नाही. प्रत्येक मनुष्य आपल्याला जितका जास्त वांटा मिळेल तितका मिळविण्याचा प्रयत्न करतो. सारांश, हल्लींच्या काळीं समाजाच्या निरनिराळ्या वर्गामध्यें राष्ट्रीय संपत्तीचा वांटा मिळण्याकरितां सारखी धडपड चालू आहे व या परस्पर चढाओढीनें प्रत्येक वर्गाच्या वांटणीचा अंश ठरला जात आहे.
ही चढाओढ म्हणजे प्राणिशास्त्रांतील जीवनार्थ-कलहाचें तत्त्व होय. व्यापारधंद्यांमध्यें प्रत्येक कारखानदारांमध्यें चढाओढ असते. आपला माल होतां होईल तितका स्वस्त करून आपल्याकडे गि-हाइकी ओढण्याचा कारखानदाराचा प्रयत्न चालू असतो. वांटणीच्या बाबतींतही समाजांतील निरनिराळ्या धनोत्पादक वर्गामध्यें चढाओढ सारखी चालू असते. जमीनदार लोकांची जितकें जास्त भाडें कुळांकडून मिळेल तितकें काढण्याबद्दल कुळांशीं चढाओढ चाललेली असते. कारखानदार मजूर जितक्या कमी वेतनानें मिळेल तितक्या कमी वेतनावर ठेवावयास पहात असतो. यामुळे सुधारलेल्या देशांत व्यक्तीव्यक्तीची चढाओढ जाऊन तेथें समाईक चढओढ सुरू झाली आहे. मजुरी कमी करण्याकरितां व आपला नफा वाढविण्याकरितां कारखादार आपले संघ करूं लागले तर उलट आपली मजुरी कमी न होऊं देण्याकरितां व ती वाढवून घेण्याकरितां मजुरांचे संघ होऊं लागलं आहेत. या संघांचा मजुरीवर काय परिणाम झालेला आहे याचा आपल्याला पुढें विचार करावयाचा आहे.
तेव्हां ज्या ठिकाणीं खासगी मालकीची संस्था पूर्ण अमलांत आलेली आहे व जेथें सर्व व्यवहार रूढींच्या किंवा कायद्याच्या तत्वावर न चालतां पूर्ण चढाओढीच्या तत्वावर चालतात अशा सुधारलेल्या देशांत संपत्तीची वांटणी कोणत्या नियमांनी होते हें प्रथमतः पाहिलें पाहिजे. येथे आपल्याला समाजांतील व्यक्तींचा व्यक्तिशः विचार करावयाचा नाही.ज्याप्रमाणें संपत्तीच्या 'उत्पत्ति' या पुस्तकांत आपण संपत्तीच्या विशिष्ट कारणांचा विचार न करतां सामाजिक कारणांचा विचार केला त्याचप्रमाणे वांटणीचाही सामाजिक दृष्ट्या विचार करावयाचा आहे; व वांटणीचे प्रश्न उत्पत्तीच्या प्रश्नाशीं अत्यंत संलग्न आहेत असें जें वर म्हटलें आहे त्याचें कारणही उघड आहे. संपत्तीच्या उत्पत्तीला जितकीं साधनें