पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/151

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१४१]

हिंदुस्थानात संयुक्तकुटुंबाच्या कल्पनेंत याच गोष्टीचा समावेश झालेला आहे. संयुक्तकुटुंबांतील पुरुषास आपल्या पश्चात् आपल्या मिळकतीची विल्हेवाट लावण्याचा हक्क नाहीं. स्वकष्टार्जित मिळकतीवर आपलें पूर्ण स्वामित्व आहे व या स्वामित्वामध्यें मिळकतीची हवी ती विल्हेवाट करण्याचा अधिकार येतो ही कल्पना आपल्या इकडे नवीन आहे. परंतु आपल्या पश्चात् आपल्या इंष्टेटीची मृत्युपत्रानें विल्हेवाट करण्याचा हक्क सर्व सुधारलेल्या समाजांत मानला जातो. व मनुष्य मृत्युपत्र न करतां वारल्यास त्याचा हक्क त्याच्या जवळच्या नातेवाइकांस जातो. हा जो वडिलोपार्जित मिळकतीवर हक्क आहे तो मर्यादित केला तरी स्वामित्वाच्या कल्पनेला बाध येत नाही. तेव्हां हा हक्क मर्यादित करणें किंवा वडिलोपार्जित मिळकतीवर मोठा कर बसविणें ही सरकारला एक मोठी उत्पन्नाची बाब आहे व तिचा जास्त जास्त प्रमाणावर उपयोग करण्यास हरकत नाहीं; ही गोष्ट अर्थशास्त्रदृष्ट्या वावगी नाहीं असें पुष्कळ अर्थशास्त्रकारांनों आपलें मत दिलेलें आहे व हल्लींच्या सुधारलेल्या पुष्कळ राष्ट्रांमध्यें हा हक्क मर्यादित करण्याकडे प्रवृति दिसून येते. सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें वांटणीच्या नियमांच्या मुळाशीं असलेल्या स्वामित्वाच्या संस्थेचा येथपर्यंत विचार झाला.
 अर्वाचीन काळच्या वांटणीच्या नियमांच्या मुळाशीं असृलेलें दुसरें तत्व ह्मणजे चढाओढीचें होय. हें तत्व सर्व देशांत व सवं ठिकाणीं व सर्वदा लागू होतें असें नाहीं; उलट हें अगर्दी अर्वाचीन तत्व अाहे. अजूनही पुष्कळ गोष्टींमध्यें संपत्तीची वांटणी ही रूढीने ठरलेली किंवा कायद्यानें ठरलेली असते. उदाहरणार्थ, जमिनीचें भाडे किंवा शेतकीच्या उत्पन्नाची वांटणी ही अजून पुष्कळ देशांत रूढीनें ठरलेली आहे; जमिनीच्या मालकानें उत्पन्नाचा कितवा हिस्सा घ्यावा, जमीन करणारानें कितवा घ्यावा ही गोष्ट पुष्कळ ठिकाणीं देशाचारावर अवलंबून आहे असे दिसून येतें; व या पुस्तकाच्या पुढील एका भागांत निरनिराळ्या देशांत व हिंदुस्थानांत प्रचलित असलेल्या जमीनधाऱ्याच्या निरनिराळ्या पद्धतींचें वर्णन करावयाचें आहे. तेव्हां या रूढीची विविधता दिसून येईल. परंतु औद्यागिक बाबींत पुढारलेल्या देशांत रूढींचें प्राबल्य कमी होऊन चढाओढीच्या तत्त्वाला महत्त्व आलेलें आहे व संपत्तीची वांटणी समाजाच्या निरनिराळ्या वर्गांत सुधार-