पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१३९]

नंतर विल्हेवाट इतक्या गोष्टींचे हक्क स्वामित्व या कल्पनेंत अन्तर्भूत झालेले आहेत. हा झाला स्वामित्व किंवा मालकी या कल्पनेंतील अर्थ. परंतु ही कल्पना अर्थशास्त्रांतील कांहीं तत्वांवर बसविलेली आहे, त्या तत्त्वाचा थोडक्यांत येथें विचार केला पाहिजे.
 या कल्पनेंतील पहिलें तत्व हें कीं, प्रत्येक मनुष्याला आपल्या निढळच्या घामानें मिळविलेल्या वस्तूचा उपभोग घेण्याचा हक्क आहे. आपल्या श्रमाचें जें फळ तें आपलें आहे त्यावर आपला अनन्य सामान्य हक्क आहे हें पहिलें अर्थशास्त्रांतील तत्व होय. । हें तत्व पूर्णपणें अर्वाचीन काळांतच सर्वमान्य झालें आहे. गुलामगिरीच्या काळांत गुलामांना आपल्या श्रमाच्या फळावर आपला हक्क सांगता येत नसे. गुलामाच्या श्रमापासून उत्पन्न झालेल्या वस्तूंवर गुलामाच्या मालकांचा सर्वस्वी हक्क असे. अगदीं रानटी स्थितीत 'बळी तो कान पिळी' हाच न्याय होता. अशा स्थितींत आपण मिळविलेल्या वस्तूचा आपण उपभोग घेऊं अशी मनुष्यास खात्री नसे, ही गोष्ट सर्वांनाच अनिष्ट आहे अशी जाणीव उत्पन्न होऊन नैसर्गिक स्थितींतील मनुष्यांनीं समाज व सरकार हीं अस्तित्वांत आणलीं व प्रत्येक मनुष्यानें आपल्या श्रमानें उत्पन्न केलेलें फळ त्याला उपभोगितां यावें अशी तजवीज व्हावी, अशा बुद्धीने या दोन संस्था मनुष्यांनीं निर्माण केल्या. तेव्हां आपल्या श्रमाचें फळ आपणांस उपभोगतां यावें या हक्काच्या तत्वाचा सांभाळ करणें याच करितां सरकार अस्तित्वांत आलें व या मानवी हक्काला सुरक्षितपणा आणणें हें सरकारचें एक आद्य कर्तव्य आहे, असें सर्व सुधारलेलीं राष्ट्रें समजतात. कारण अशी खात्री असल्याशिवाय मनुष्याचे हातून श्रम होणारच नाहींत. याच दृष्टीनें खासगी स्वामित्वाला व कल्पनेला पुष्कळ अर्थशास्रकारांनीं रानाचें उपवन बनविणारी जादूची कांडी म्हटलें आहे. कोणत्याही मनुष्याला आपल्या श्रमानें मिळविलेल्या वस्तू आपल्याला मिळतील अशी खात्री असली म्हणजे तो आपलें श्रमसर्वस्व संपत्ति मिळविण्यांत खर्च करतो. व त्या योगानें देशांत संपत्तीची वाढ जारीनें होते. स्वामित्त्वाच्या कल्पनचें अर्थशास्त्रदृष्ट्या जें इतकें महत्त्व आहे तें या मानवी स्वभावामुळेंच होय.
 खासगी स्वामित्त्वाच्या कल्पनेंत असलेलें दुसरें तत्त्व असें आहे. दुस-यांशीं करार करून मिळविलेल्या वस्तूंवर आपला हक्क आहे. ज्या-