पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१३७]

शेतीचें उत्पन्न ही एक महत्त्वाची उत्पन्नाची बाब असल्यामुळें जमीनधाऱ्याच्या निरनिराळ्या पद्धतीच विवेचन करणें इष्ट आहे. त्याच ठिकाणीं हिंदुस्थानांतील निरनिराळ्या जमीनधाऱ्याच्या पद्धतीचें निरूपण करण्याचा विचार आहे. पुढें वर निर्दिष्ट केलेल्या संपत्तीच्या वांटणीच्या स्वरूपांत कशी असमता उत्पन्न होते व त्यामुळें संपत्तीच्या वाढीबरोबर समाजांतील बहुजनसमाजाची सांपत्तिक स्थिति त्या मानानें कां सुधारत नाहीं व ती सुधारण्यास कोण कोणते उपाय योजण्यांत अगर सुचविण्यांत आलेले आहेत त्याचा विचार करणें इष्ट होईल. हे उपाय दोन प्रकारचे आहेत, एक स्वावलंबनपर व दुसरे सामाजिक पंथानें सुचविलेले. सामाजिक पंथानें सुचविलेल्या उपायांचा विचार करण्यापूर्वी या पंथाचा साग्र इतिहास एका भागांत देण्याचा विचार केला आहे व शेवटीं या दोन्ही उपायांच्या शक्याशक्यतेबद्दल विवरण करून हें पुस्तक संपवावयाचें आहे.

भाग दुसरा.
वांटणीच्या मुळाशीं असलेल्या कल्पना व सस्था.

 संपत्तीच्या वांटणीच्या मुळाशीं असलेली पहिली कल्पना ह्मणजे खासगी स्वामित्वाची कल्पना होय, हें पहिल्या भागांत सांगितलेंच आहे. खासगी स्वामित्व ह्मणजे काय, हें स्वामित्व समाजांत केव्हां व कसें उत्पन्न झाले; त्यामध्यें कोणकोणत्या हक्कांचा समावेश होतो, वगैरे या संबंधाचे बरेच प्रश्न आहेत. परंतु या कल्पनेचा साकल्येंकरुन विचार करणे हें ख़रोख़री कायदेशाखाचें काम आहे. येथें आपल्याला या प्रश्नाचा फक्त अर्थशास्त्रदृष्ट्या विचार करावयाचा आहे.
 कोणत्याही वस्तूवर एखाद्याचें स्वामित्व आहे ह्मणजे काय ? तर त्या वस्तूचा कोणताही उपयोग करण्याचा, ती उपभोगण्याचा, ती विकण्याचा आगर देण्याचा व आपल्या पश्चात तिची विल्हेवाट लावण्याचा हक्क त्या माणसास आहे. म्हणजे उपयोग, ह्यातींत व मरणा-