पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/147

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१३७]

आणण्याचें पूर्ण सामर्थ्य आहे असें गृहीत धरलें आहे; परंतु हीही गोष्ट सर्वांशी खरी नाहीं. ज्या कायद्याला थोडेंसें तरी लोकमत अनुकूल नाहीं असा कायदा जरी सरकारनें केला तरी तो मृत कायद्याप्रमाणेंच राहतो असा सर्व देशांचा अनुभव आहे. तेव्हां सरकारचें सामर्थ्यही या बाबतींत मर्यादित आहे हें विसरतां कामा नये. परंतु संपत्तीच्या उत्पत्तीच्या नियमांपेक्षां संपत्तीच्या वांटणीच्या नियमांमध्यें थोडाफार फरक करतां येण्यासारखा असतो, ही गोष्ट निर्विवाद आहे व यामुळे संपत्तीच्या वांटणीसंबंधानें निरनिराळ्या समाजांत भिन्न भिन्न स्थिति दिसून येते. हा फरक विशेषतः शेतकीच्या उत्पन्नाच्या बाबतींत विशेष तऱ्हेनें दृष्टीत्पत्तीस येतो. ह्मणून या पुस्तकांत आपल्याला शेतकींतील निरनिराळ्या वांटणींच्या पद्धतींचें वर्णन करावें लागणार आहे. प्रथमतः औद्योगिक बाबतींत पुढारलेल्या देशांमध्यें संपत्तीची वांटणी कोणत्या नियमांनुसार होते हें पहावयाचें आहे. हें पहाण्याकरितां वांटणीच्या मुळाशीं कोणतीं तत्वें गृहीत धरलीं आहेत, याचें थोडक्यांत विवेचन केलें पाहिजे. सर्व सुधारलेल्या देशांत ही संपत्तीची वांटणी विशिष्ट रुढी अगर कायदे यांनीं होत नसून ती एकप्रकारें अगदीं स्वाभाविक तऱ्हेनें होते व ती स्वाभाविक तऱ्हा म्हणजे संपत्तीच्या उत्पत्तीला कारणीभूत होणारे जे जे समाज - तील वर्ग त्या त्या वर्गांमध्यें प्रथमतः वांटणी होणें ही होय. हे वर्ग चार आहेत, असें मागल्या पुस्तकांत सांगितलें आहे. एक जमिन व इतर नैसर्गिक साधनें यांच्या मालकांचा वर्ग; दुसरा मजुरांचा वर्ग; तिसरा भांडवलवाल्यांचा वर्ग व शेवटचा कारखानदारांचा वर्ग. प्रत्येक प्रकारच्या संपत्तीच्या उत्पत्तीला या चार वर्गांच्या मालकीच्या साधनांचें एकीकरण व्हावें लागतें व संपत्तीच्या उत्पत्तीस केलेल्या मदतीबद्दल त्यांना योग्य मोबदला द्यावा लागतो व या मोबदल्याला या वर्गाचें उत्पन्न म्हणतात. मालकवर्गाला भाड्याचे रूपानें उत्पन्न मिळतें, मजुरांना मजुरीच्या रूपानें उत्पन्न मिळतें, भांडवलवाल्यांना व्याजाच्या रूपानें उत्पन्न मिळतें व शेवटीं कारखानदारांना नफ्याच्या रूपानें उत्पन्न मिळतें. तेव्हा भाड, मजुरी, व्याज व नफा हे समाजांतील उत्पन्नाचे चार मुख्य प्रकार झाले, किंवा संपत्तीचे हे मुख्य चार वांटे झाले. या प्रत्येकाचें स्वरुप काय व त्याचे नियम काय यांचें या पुस्तकांत प्रथमतः निरूपण करावयाचें आहे. नंतर