पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/144

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१३४]

पैदा करतो. एखाद्या देशांत जें धान्य किंवा दुसरी एखादी संपत्ति उत्पन्न होते तिची देशांतील लोकांमध्यें वांटणी अदलाबदलीनेंच होते. यावरून वांटणीचे स्वतंत्र असे नियम नाहींत व म्हणून वांटणीचा विचार 'संपत्तीच्या अदलाबदलींच्या' प्रकरणांतच करणें योग्य आहे. जे ग्रंथकार 'वांटणी’ला स्वतंत्र स्वरूप देत नाहींत त्यांची विचारसरणी वरील प्रकारची असते. परंतु खालील विवेचनावरून वांटणीचें निराळे स्वरूप आहे व त्याचे नियमही विचार करण्यासारखे आहेत व त्या नियमांचें महत्वही उत्पत्तीच्या नियमांप्रमाणेंच असून समाजांत संपत्तीची वांटणी होण्याचे नियम समाजांतील संपत्तीच्या उत्पत्तीच्या पद्धतीवर पुष्कळ अंशीं अवलंबून आहेत असें दिसून येईल. प्रथमतः वांटणी ह्मणजे काय व या प्रश्नाच्या मुळाशीं कोणत्या सामाजिक संस्था व कल्पना आहेत याचा विचार करणें अवश्य आहे. ह्मणजे वांटणीच्या सामान्य सिद्धांताचें व नियमांचें स्वरूप व महत्व हें चांगल्या तऱ्हेनें दृग्गोचर होईल.
 ज्या वेळीं मनुष्य अगदीं रानटी स्थितींत असून आपल्या गरजा आपल्या एकट्याच्याच श्रमानें भागवीत असतो त्यावेंळीं संपत्ति म्हणण्यासारखी तयार नसते व तिच्या वांटणीचा प्रश्नच उद्भवूं शकत नाहीं. संपत्तीचा उत्पादक एकटाच असतो व तिचा तो एकटाच उपभोक्ताही असतो. म्हणजे या काळांत प्रत्येक मनुष्य हा एका दृष्टीनें पशूप्रमाणें स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण प्राणि असतो. परंतु जेव्हां श्रमविभागाचें तत्व अमलांत येऊन एक मनुष्य एकाच जातीच्या वस्तु करण्यांत आपलें श्रम-सर्वस्व अर्पण करतो व आपल्या इतर गरजा दुस-याच्या श्रमाच्या फलापासून भागविण्याची अपेक्षा करतो; तसेंच जेव्हां एक वस्तु करण्यास पुष्कळ साधनें व पुष्कळांचे श्रम लागूं लागतात तेव्हां संपत्तीच्या वांटणीचा प्रश्न उद्भवतो. कारण प्रत्येकाच्या श्रमाच्या मानानें किंवा संपत्तीचीं साधनें पुराविण्याच्या मानानें त्याला त्या संपत्नीचा वांटा मिळाला पाहिजे हें उघड आहे. शेतांत जें उत्पन्न पिकतें तें जमिनीचा मालक शेतीच्या औताचा व साधनांचा मालक म्हणजे कसणारें कूळ व शेतांवर हंगामी काम करणारे मजूर या तिघांच्या श्रमाचें फळ होय. तेव्हां शेतांतील उत्पन्नाचे तीन वाटे झाले पाहिजेत हें उघड आहे. हे वांटे कोणत्या प्रमाणानें व्हाववाचे याबद्दल निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळी पद्धति अंमलांत असेल.