पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/138

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१२८]

आहे. कारण प्राथमिक सामान्य शिक्षणांत लिहिणें वाचणें, साधारण अंकगणित इतक्या गोष्टी येतात.याच्यायोगानें मानवी बुद्धीस थोडेंसें चालन मिळतें व मानवी दृष्टि थोडी तरी फांकते. प्राथमिक धंदेशिक्षणांत साधारण उपकरणें व हत्यारें यांच्या उपयोगाची माहिती व साधारण हस्तकौशल्य इतक्यांचा अंतर्भाव होतो. हें दुहेरी शिक्षण पुढील सर्व धंद्यांना पायारूप आहे. अशा द्विविध शिक्षणानें सामान्य मजुरांची कर्तबगारी पुष्कळ वाढते असा सर्व सुधारलेल्या देशांत अनुभव आलेला आहे व मजुरांच्या कर्तबगारीवर संपत्तीच्या उत्पत्तीचे प्रमाण पुष्कळ अंशानें अवलंबून आहे हें मार्गे दाखविलेच आहे.
 सामान्य उच्च शिक्षण व उच्च धंदेशिक्षण हें कारखानदार किंवा व्यापारी किंवा स्वतंत्र विराटस्वरूपी धंदा करणा-यांना अवश्यक आहे. कारण सामान्य शिक्षणानें निरनिराळ्या मानस शक्तींचा विकास होतो व निरनिराळे बौद्धिक गुण व इतर मानसिक गुण मोठ्या प्रमाणावरील कारखानदारांस कसे अवश्यक आहेत हें मागल्या भागांत दाखविलेंच आहे. अर्वाचीन काळच्या प्रचंड कारखान्याचे कारखानदार म्हणजे सेनापतीसारखे आहेत व ज्याप्रमाणें सेनापति जितका बुद्धिमान् व जितका कल्पक, जितका विचारी व जितका शिकलेला असेल तितका उत्तमच; त्याचप्रमाणें कारखानदारांची गोष्ट आहे. उच्च धंदेशिक्षणांत त्यांच्या विशिष्ट धंद्याच्या सर्व ज्ञानाचा समावेश होतो. अशा द्विविध शिक्षणानें तयार झालेला कारखानदार कारखाना यशस्वी केल्याखेरीज राहणार नाहीं. या दोन्ही प्रकारच्या शिक्षणाचें महत्व औद्योगिक प्रगतीला किती आहे हें अमेरिका व जर्मनी या दोन देशांच्या उदाहरणांवरून चांगलें दृष्टीस पडतें. आणखी अलीकडील व विशेषतः पूर्वेकडील उदाहरण पाहिजे असल्यास जपानचें आहे. अमेरिका व जर्मनी हे दोन्ही देश औद्योगिक व व्यापारी बाबतींत इंग्लंडच्या किंती तरी मागे होते. अमेरिका ब्रिटिश अंमलाखाली होती तोंपर्यंत त्याची औद्योगिक वाढ इंग्लंडच्या व्यापारी वर्गाच्या हेव्यानें झाली नाही. अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतर थोडीबहुत प्रगति होऊं लागली. परंतु गुलामाचा प्रघात कांहीं ठिकाणीं तरी उद्योगवृद्धीला प्रतिबंधक झाला यांत शंका नाहीं. पुढें या गुलामगिरीच्या कारणांवरून उत्तरेकडील संस्थानें व दक्षिणेकडील संथानें यांमध्यें तुमुल युद्ध झालें व त्यांत उत्तरे