पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/135

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१२५]

सहाव्या पुस्तकांत करावयाचा आहे त्यापेक्षां येथें त्याचा विचार करण्याची जरूरी नाहीं. भांडवलाच्या वाढीला अनुकूल म्हणून ज्या गोष्टी वर सांगण्यांत आल्या आहेत त्यांसंबंधानें हिंदुस्थानच्या लोकांची काय स्थिति आहे याचा थोडक्यांत विचार करून हा भाग संपवावयाचा आहे.
 दूरदृष्टि व काटकसर या बाबतींत आमच्या सर्व जातींतील सर्व लोकांची पुष्कळच उन्नति झालेली आहे. आपलें उत्पन्न कितीही थोडें असो त्यांतूनच शिल्लक टाकण्याची प्रवृति अगदीं सार्वांत्रिक आहे. आमच्या लोकांची एकंदर राहणीच अगदीं साधी असल्यामुळें व प्रत्येक जातीची राहणी व चालीरीती अगदीं आंखून टाकल्याप्रमाणें असल्यामुळें मनुष्याच्या कमी जास्त प्राप्तीप्रमाणें आमच्या लोकांत कमी जास्त खर्च होत नाहीं. ह्मणून उत्पन्न जास्त झाल्यास त्या मानानें खर्च वाढत नाहीं व शिल्लक आपोआप वाढत जाते. इंग्रजी शिक्षणानें, शहरांतील राहणीनें व परकी लोकांच्या सहवासानें नव्या नव्या सोयींच्या व चैनीच्या वस्तूंच्या पुरवठ्याचीही प्रवृत्ति जात चालली आहे हें खरें आहे. परंतु भांडवलाच्या वाढिला अनुकूल असलेली पहिली गोष्ट आमच्यामध्यें आहे यांत शंका नाहीं; व जें कांहीं थोडेंबहुत भांडवल वाढत आहे तें या प्रवृत्तीचेंच फळ आहे यांत शंका नाहीं. मात्र ही दूरदृष्टी व काटकसरीची प्रवृत्ति धार्मिक कल्पनांमुळे दोन बाबतींंत विफल होते. त्या बाबती म्हणजे लग्रकार्यांदि धार्मिक कृत्यें व मरणानंतरचीं मेलेल्या माणसाचींं दिवसादिक धर्मकृत्यें होत. लग्रकार्यांमध्यें आमच्या लोकांचा अतोनात खर्च होतो व या वेळींं काटकसरीपेक्षां उधळेपणाकडे व कर्ज काढून सण करण्याकडे आमच्या लोकांची प्रवृत्ति आहे. ही प्रवृत्ति पांढरपेशा व इतर सर्व जातींच्यामध्यें सर्वसाधारण आहे. मर्तिकाकारतां विलक्षण खर्च करण्याची प्रवृत्ति खालच्या जातींत विशेष आहे. या देन उधळपट्टीच्या खालच्या वर्गाच्या प्रवृत्तीवरून आमच्या समाजाची पूर्ण माहिती नसणारे युरोपियन लोक, आमचा शेतकरीवर्ग अत्यंत उधळा आहे; व त्यांच्या कर्जबाजारीपणाचें कारण त्यांचा उधळेपणा होय; या कर्जबाजारीपणाचा संबंध जबर सरकारी साऱ्याशीं किंवा सारा वसूल करण्याच्या पद्धतीशीं किंवा इंग्रजी अमलानें आणलेल्या दुस-या कोणत्याही गोष्टीशीं नाहीं असें बेधडक विधान करतात. या विषयाचा विचार आपल्याला पुढें करावयाचा आहे.