पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२०]

सामान्य व सहज मनांत येणारा अर्थ धरून चालावयाचें नाहीं. कारण, जर प्रत्येक मनुष्य आपली वासना कमी करूं लागला तर संपत्ति उत्पनच होऊं शकत नाहीं. कारण, संपत्तीच्या उत्पत्नीचें एक अमूर्त कारण नाहींसे होतें व संपत्तीचा उत्पत्तिच बंद झाली म्हणजे भांडवल वाढत नाहीं इतकें नव्हे तर देशांताल असलेलें भांडवल नाहींसें होतें.
 तेव्हां भांडवल वाढण्याचें खरें कारण म्हणजे संपत्तीची पुष्कळ उत्पत्ति व पुष्कळ व्यय होय. अर्थात संपत्तीचा जोरानें व्यय होऊं लागला कीं उत्पत्तीला उत्तेजन मिळतें व उत्पति व ध्येय या दोहोंची वाट म्हणजे लोकांच्या नफ्याची वाढ व नफ्याची वाढ म्हणजे भांडवलाची वाढ होय. याला हिंदुस्थानच्या गेल्या दोनचार वर्षांचें उदाहरण उत्तम आहे. मुंबईस गिरण्यांचा व्यापार आज पुष्कळ वर्षे चालू आहे, परंतु गेल्या वीस किंवा पंचवीस वर्षांत भांडवलाची वाढ झाली नसेल इतकी वाढ गेल्या ३॥४ वर्षांत झाली. ही वाढ कशी झाली ! या गिरणीवाल्यांनी आपला खर्च अगदीं कमी करून सर्व उत्पन्न मागें टाकलें काय ? नाहीं. या भांडवलाच्या वाढीशी त्यांच्या खासगी उत्पन्नाचा किंवा खर्चाचा संबंध नाहीं. ही भांडवलाची वाढ व्यापाराच्या विलक्षण तेजीनें झाली व ही व्यापाराची तेजी म्हणजे तरी काय ? हिंदुस्थानामध्यें जी एक स्वदेशीची लाट उसळली त्या लाटेमुळे मुंबईच्या ,मालाला मागणी फार वाढली. यामुळे गिरणीवाल्यांनी आपल्या मालाची पैदास आपल्या गिरण्यांच्या पराकाष्ठेच्या शक्तीपर्यंत वाढविली व त्यांचा माल उत्पन्न झाल्याबरोबर किंवा आधींच विकला जाऊं लागला. या संपत्तीच्या उत्पति व व्यय यांच्या भराभर परिवर्तनानें भांडवलाची वाढ झाली. गेल्या २॥३ वर्षात पांचपंचवीस नवीन गिरण्या निघून मुंबईच्या कारखानदारांनी २-३ कोटींच्या ब्यांका काढल्या व टाटाच्या लोखंडाच्या कारखान्यास २ कोटी भांडवल पुरविलें. इतका हा भांडवलाचा पूर कशानें झाला? काटकसरीनें साफ नव्हे. तर कारखानदारास नफा फार झाला त्याच्यायोगानें होय.
 वरील विवेचनावरून मिल्लच्या सिद्धान्तामधील ख-याखोट्याचा भाग तेव्हाच ध्यानात येईल. ज्या वेळीं प्रत्येक मनुष्य आपल्या गरजा स्वतःच्या श्रमाने भागवितो त्यावेळीं काटकसरीनें शिल्लक पडते व त्याच्यायोगानें भांडवल तयार होतें हें म्हणणें खरें आहे। परंतु ज्या काळीं उद्योगधंदे