पान:Aagarakar.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७६

सुधारणा म्हणजे काय ?

फायद्याची परवा करण्याची गरज नाहीं, म्हणजे कोणत्याहि गोष्टीमुळें पुष्कळांचें कल्याण होत असून, थोड्यांस पीडा होत असेल तर ती बेधडक करण्यास हरकत नाहीं. कित्येकजण हा स्थूल अर्थ संकुचित करून, राष्ट्राच्या राजाचें किंवा त्यांतील श्रेष्ठ लोकांचें जें कल्याण तें साऱ्या राष्ट्राचे किंवा समाजाचें कल्याण असा विशिष्ट अर्थ करतात. अशा अर्थानुरोधानें ज्या समाजांत वर्तन होत असतें, त्यांत एका पक्षाकडे संपत्ति आणि सत्ता व दुसऱ्या पक्षा- कडे दारिद्र्य आणि दास्य अशी वाटणी झालेली असते. अशा समाजां- तील सामान्य लोकांस शुद्ध वन्यावस्थेतील सुखाहून अधिक सुख होत असेल असें जरी मानितां आलें, तरी त्यांत त्यांचें पूर्ण समाधान होण्यासारखें तें नसलेच पाहिजे हें उघड आहे. प्रत्येकाने वन्य पशुप्रमाणें रानोमाळ फिरत असावें, यापेक्षां ओबडधोबड समाजरचना होऊन कांहींनीं स्वामी व कांहींनी किंकर व्हावें, ही स्थिति बरी. कारण कशा तरी रीतीनें समाज एकवार अस्तित्वांत आल्याशिवाय, त्यांतील अवयवांस त्यापासून होणाऱ्या सुखाचा लाभ होऊं लागणे अशक्य आहे. पण मनुष्यें समाज स्थापूं लागल्या- बरोबर त्यांत जीं शारीरिक किंवा मानसिक सामर्थ्यानें इतरांहून श्रेष्ठ असतील त्यांच्या हाती सत्ता व बहुतेकांच्या श्रमांचें फळ जाणें अगद स्वाभाविक आहे. तेव्हां समाजाच्या प्रथमावस्थेत जे सामर्थ्यवान् असतील त्यांच्या हातीं सत्ता असणें व दुर्बलांना दास्य करावे लागणें हें ज्या दिशे - कड़े उतार असेल त्या दिशेस पाण्याचा ओघ जाण्यासारखें होय. (हा ओघ बंद करून सर्वास सारखें, निदान होईल तितके सारखें, सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणें म्हणजे सुधारणा होत जाणें, असें म्हणण्यास हरकत नाहीं.