पान:Aagarakar.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार ७२
विशेष प्रकारची असल्यामुळे त्यास आपलें स्वाभाविक स्वातंत्र्य मर्यादित करून घेण्यांत व समाजावस्थेत अवश्य असणाऱ्या पारतंत्र्याचा अंगीकार कर- ण्यांत दुःखाहून अधिक दुःख प्राप्त होतें; आणि म्हणूनच तो कितीहि त्रास सोसावा लागला तरी समाज सोडून जात नाहीं. पण यावरून असें सिद्ध होत नाहीं कीं, स्वभावत: सुखावह असें जें स्वातंत्र्य त्याचा आवश्यकतेबाहेर संकोच करून घेण्यांत कोणत्याही प्रकारचा फायदा आहे. पण चमत्कार असा आहे कीं, मनुष्य एकांतावस्था टाकून जसजसा समाजप्रिय होत जातो तसतशी त्याची स्वातंत्र्यशक्तीहि थोडीशी क्षीण होत जाते, व अखेरीस त्यास ही शुद्ध दास्यावस्थाही असह्य वाटेनाशी होते. पण ही त्याची अंत्या- वस्था नव्हे. आपणांस जे स्वामी म्हणवीत असतात अशांचे दुष्ट वर्तन व त्यामुळे मनास व शरीरास वारंवार होणारी पीडा यांमुळे अत्यंत सहनशील मनुष्यास आपल्या नैसर्गिक स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची इच्छा उत्पन्न होते. एकदां या इच्छेनें त्याच्या अंतःकरणांत बळकट मूळ धरलें कीं, त्याच्या उन्नतावस्थेस आरंभ झाला म्हणून समजावें. ज्यांना नेहमीं दुसऱ्या- वर जुलूम करण्याची किंवा सक्तीचा अंमल बजावण्याची संवय असते, ते असे म्हणतात की, मनुष्य हा आप्पलपोटा प्राणी आहे; स्वहितासारखी त्याला दुसरी प्रिय वस्तु नाहीं; व कोणतीही गोष्ट करण्यांत स्वहितसाधनाहून त्याचा अन्य हेतु असत नाहीं. जुलमी लोकच अशा तत्त्वशास्त्राचे प्रतिपादक व प्रसारक असण्याचें कारण असें कीं, एक तर ज्या वृत्तीच्या धोरणानें त्यांचे वर्तन अहोरात्र होत असतें त्या वृत्तीश इतर वृत्तीपेक्षां त्याचा विशेष सह- वास असल्यामुळें त्याच्या डोळ्यांपुढें सर्वत्र तीच दिसत असते व आपल्या अंतःकरणाप्रमाणे इतरांच्या अंतःकरणांतही तिचेंच साम्राज्य असेल अशी त्यांची भावना होते. दुसरें असें कीं, त्यांच्या जुलमास कंटाळलेले व त्रास- लेले लोक संतापून जाऊन स्वसंरक्षणासाठी हवें तें घाडस करण्यास प्रवृत्त होत असतात. यामुळे त्यांना आसमंतांतील सर्व सचेतन जगत् स्वार्थपरा- यण होऊन आपल्या नाशास उद्युक्त झालें आहे, असें वाटत असतें. व आपणच त्यांच्या संतापाचे व धाडसाचें आदिकारण आहों याचें भानही नाहींसें होतें ! परंतु स्वातंत्र्याचा उपभोग प्राप्त होत असलेल्या मनुष्यांचें वर्तन ज्यांनी थोड्या काळजीनें पाहिलें असेल त्यांना असें दिसून आलें