पान:Aagarakar.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

६६

सोडणे किती जिवावर येतें हें बालविवाह, केशवपन, सुतक इत्यादि प्ररूढ चालींचा विचार करतां, तेव्हांच लक्षांत येणार आहे. समाजांतील शेकडा नव्याण्णव लोकांची स्थिति अंधपरंपरेप्रमाणें असते. मळलेल्या वाटेच्या बाहेर एक पाऊल टाकल्यानेंसुद्धां आपणांवर मोठा भयंकर प्रसंग गुदरेल, असा धाक त्यांस क्षणोक्षणी वाटत असतो.
 या संबंधानें आणखी एक गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगी आहे ती अशी- ज्याप्रमाणें व्यक्तीच्या शरीरांतील निरनिराळे अवयव आपापली कार्यै पृथक्- पणानें करून एकमेकांस साहाय्य करतात, त्याप्रमाणे सामाजिक शरीरांतले निरनिराळे भागही आपापली कार्ये स्वतंत्रपणे करून इतरांस मदत करीत असतात. पण पुढें असाही प्रकार घडून येतो की, समाजाच्या एका स्थितीत ज्या वर्गाची आवश्यकता असते तो वर्ग समाजाचें स्थित्यंतर झाल्या- मुळे अगदी निरुपयोगी झाला तरी, सहसा नाहींसा होत नाहीं. उदाहरणार्थ बडोद्यासारख्या संस्थानांतील बारगीर घ्या. यांचे आतां कांहीं एक प्रयोजन नाहीं; पूर्वी यांच्याकडून जी कामगिरी होत असे तिची आतां गरज राहिली नाहीं; तथापि त्यांचा चरितार्थ चालविणें संस्थानांस भाग पडत आहे. या बारगिरांप्रमाणेंच आमच्या बहुतेक संस्थानिकांची, जहागीर- दारांची, त्यांच्या सैन्यांची, निरनिराळ्या ठिकाणच्या देवस्थानांची, धर्मा- धिकाऱ्यांची व त्यांच्या मठांची, कित्येक धंदेवाल्यांची, आणि अनेक आचारांची गोष्ट आहे. ज्याप्रमाणें वार्धक्यामुळे श्रम करण्यास अयोग्य ठर- लेल्या लोकांस नोकरीवरून दूर करून त्यांचे जागीं नवीन लोकांची योजना केली तरी त्यांना पेनशनदार करून ठेवावें लागतें, त्याप्रमाणें समाजाचें स्थित्यंतर होऊन त्यांतील कोणताही वर्ग निरुपयोगी ठरला तरी त्याचा बोजा बरींच वर्षे समाजास वहावा लागतो. कारण ज्याप्रमाणें कोणत्याही व्यक्तीस आपण होऊन पंचत्वास मिळणे आवडत नाहीं, त्याप्रमाणें समाजाच्या कोणत्याही अवयवास तें आवडत नाहीं. व्यक्तीप्रमाणेंच समाजाचे अवयवही आपापले अस्तित्व दीर्घतम करण्याविषयीं झटत असतात.
 येथपर्यंत सांगितलेल्या गोष्टींवरून समाजाचें रूपांतर होण्यास किती प्रत्यवाय असतात हें वाचकांच्या लक्षांत बरेंच आलें असेल. तथापि ज्यांच्या मनांत ही गोष्ट अजूनही बरोबर आली नसेल त्यांच्या समजुतीसाठीं