पान:Aagarakar.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार
किती कुशाग्रत्व दाखविलें आहे हें पहाण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांचा “ Is Ramayana copied from Homer?" ( ( रामायण होमरवरून उतरले आहे काय ? ) या नांवाचा निबंध वाचावा.
 "ठाअसो; प्रस्तुत विषयाच्या संबंधानें ह्या गोष्टीचा आम्ही येथें एवढ्यासाठींच उल्लेख केला आहे कीं, पौराणिक कालांत आमचें ग्रीक लोकांशीं इतकें साम्य असतां पुढे आम्हां उभयतांत जे अंतर पडत गेलें त्यामुळे त्यांच्या व आमच्या इतिहासास पराकाष्ठेची विभिन्नता आली. कांहीं कलांत व विद्यांत अजरामर कीर्ति संपादून व त्या कलांचें आणि विद्यांचें बीं नवीन लोकांत लावून, जुने ग्रीक लोक अंतर्धान पावले ! आम्ही आमची जी थोडीबहुत पुंजी होती तिला घट्ट मिठी मारून काळाच्या तीव्र प्रहारांस न जुमानतां आजपर्यंत कशी तरी प्राणयात्रा करीत आलों ! अशा रीतीनें युगेच्या युगें जगणें हें चांगलें, किंवा थोडींच शतकें का होईना, पण स्वतःचे नांव अमर करून व जगाच्या इतिहासाला चांगलेपणाचें वळण लावून नाहींसें होणे चांगलें, याचा निश्चय करणे फार कठीण आहे ! तथापि येवढें खास म्हणतां येईल कीं, आमच्या सुधारणेस खळ पडल्यापासून ज्या स्थितीत आम्ही कुजत पडलों आह त्याच स्थितीत आम्हांस युगेंच्या युर्गे लोटावयाचीं अस- तील तर आम्ही एकदम नाहींसें व्हावें हें इष्ट आहे ! ज्यांना कधीही चांगला दिवस बिलकुल येण्याची आशा नाहीं, त्यांनीं चैतन्याला बिलगून रहाणें हैं शुद्ध पिसेपण नव्हे काय ? आम्हांस अशी दशा येऊन ठेपली आहे असें आम्ही पाहिजे तर म्हणत नाहीं, पण गेल्या दोन हजार वर्षांचा आमचा जो इतिहास आहे त्यावरून पहातां केवळ जीवरक्षणापलीकडे आम्हीं कांहींएक केलें नाहीं, असें म्हणणें भाग पडेल! आणि पुढेही जर अशाच रीतीनें वागण्याचा आमचा विचार असेल तर आम्ही मोठे अद्वितीय जंतु आहों असें मानिलें पाहिजे !
 पुष्कळ देशाभिमान्यांस अशा प्रकारचें लिहिणे आवडत नाहीं ! पण आम्हीं त्याला काय करावें ? जी गोष्ट उघडपणें बोलून न दाखविणें म्हणजे आजमितीस मोठा अपराध करणें असें आम्हांस वाटतें, ती बोलून टाकल्या- वांचून आमच्याने राहवत नाहीं, याला आमचा काय इलाज आहे ? ज्या लोकांना आमची ही आत्मनिंदा रुचत नाहीं, त्यांनी आम्हांस आत्मस्तुति